लोकसभेसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्राच्या सात उमेदवारांचा समावेश, वाचा कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?


नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नसताना काँग्रेसने सात उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ हे राखीव आहेत.

काँग्रेसने गुरूवारी जाहीर केलेल्या ५७ जणांच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील सात, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणमधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशातील २ आणि पाँडेचरीतील एका उमेदवाराचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सात उमेदवार असे

  •  कोल्हापूरः शाहू महाराज
  • पुणेः रविंद्र धंगेकर
  • नंदूरबारः गोवाल पाडवी
  • सोलापूरः प्रणिती शिंदे
  • लातूरः शिवाजी काळगे
  • नांदेडः वसंत चव्हाण
  • अमरावतीः बळवंत वानखेडे

मविआच्या जागावाटपाचे काय होणार?

महाराष्ट्रात काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. या आघाडीत काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र वंचितचा मविआमध्ये समावेश होणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

अशातच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत कोणाच्या वाट्याला कोणत्या आणि किती जागा येणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नसताना काँग्रेसने सात जागांवर अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे.

या तीन मतदारसंघात अशा होतील लढती

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील सात जागांपैकी तीन जागांवरील लढती स्पष्ट झाल्या आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी होईल. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांची तर नंदूरबारमध्ये भाजपच्या हीना गावित यांच्याशी काँग्रेसचे गोवाल पाडवी यांची लढत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!