बुद्ध लेणी बचाव महामोर्चात उसळला लाखोंचा जनसागर, शिस्तबद्ध महामोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत असलेल्या बुद्ध लेणी-धम्म भूमी बचावच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात अतिविशाल महामोर्चा निघाला. सर्व आंबेडकरी पक्ष-संघटना गट-तट विसरून या महामोर्चात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेस, वंचित बहुजन अघाडी, एमआयएमसह अनेक राजकीय पक्षांनीही या महामोर्चाला पाठिंबा जाहीर केला होता.

या महामोर्चात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासूनच शहराबरोबरच मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने बौद्ध उपासक क्रांती चौकात गोळा होऊ लागले.  या महामोर्चाच्या मार्गावर विविध पक्ष संघटना आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी, पाणी, चहा, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

शुभ्र वस्त्र परिधान केलेले मोर्चेकरी हातात विविध मागण्यांचे फलक, पंचरंगी-निळे झेंडे घेऊन घोषणा देत शिस्तीत चालत होते. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी छत्रपती संभाजीनगर शहर अक्षरश: दणाणून गेले.

या महामोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुव्यवस्था राखून वाहतुकीचे नियोजन सुरळित करता यावे म्हणून विद्यापीठाबरोबरच शहरातील शाळांना आज सुटी देण्यात आली होती. त्यामुळे अबाल वृद्धांसह या महामोर्चात शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरूणांचा सहभाग लक्षणीय ठरला.

क्रांती चौकात भिक्खू संघाकडून उपासकांना सूचना देण्यात येत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास क्रांती चौकातून प्रारंभ झाला.पैठण गेट, टिळक पथ, गुलमंडी, सिटीचौक,  शहागंज येथील गांधी पुतळा, हर्ष नगरमार्गे हा महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

बुद्ध लेणी या च्या पायथ्याशी  मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली. हा संताप या महामोर्चातून दिसून आला.

विभागीय आयुक्तालयावर हा महामोर्चा धडकल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. तेथे काही नेते आणि भिक्खूंची भाषणे झाली. नंतर भिक्खू संघाचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर अखिल भारतीय भिक्खू संघाने बुद्ध वंदना घेतल्यानंतर या महामोर्चाची सांगता झाली.

 भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांनी या महामोर्चाचे नेतृत्व केले. या महामोर्चात भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, भंते बोधीधम्म, भंते उपाली भंते निर्वाण, भंते आनंद यांच्यासह  महाराष्ट्र भरातील बौद्ध भिक्खू आणि लाखोंच्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका सहभागी झाले होते.

जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बुद्ध लेण्यांच्या सोबतच पायथ्याशी असलेल्या विपश्यना बुद्ध विहार येथे मागील ६० ते ७० वर्षांपासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात. लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक, लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून, सहभागातून बौद्ध विहार, भिक्खू कुटी, सभा मंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे.

मूळात हजारो वर्षापासून बुद्ध लेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल?, असा प्रश्न उपस्थित करत जागेच्या मालकीची शहानिशा न करताच बौद्धांचे ऐतिहासिक स्थळ हटवण्यामागे मनुवादी सरकारचे कटकारस्थान असल्याचा आरोप मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे.

महामोर्चाच्या प्रमुख मागण्या

  • बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.
  • बुद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा.
  • बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा.
  • बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी.
  • ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी.
  • अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.
  • महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावरील इतर धर्मीयांची अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बुद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिले.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *