
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेट परीक्षेतून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान इद्रिस खान हिला बेगमपुरा पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. त्यामुळे आस्मा खानची ईद पोलिस कोठडीतच साजरी होणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि कोहिनूर शिक्षण संस्थेचा सहसचिव पठाण मकसूद खान हा सध्या फरार आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.
कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी व हिंदी विषयातील एम.फिल.ची बोगस पदवी तयार केली होती. या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे या दोघांनी २०२१ मध्ये पेटमधून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. याबाबत रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी दोन्ही विद्यापीठांकडे लेखी तक्रार केली होती.
याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी १३ मार्च रोजी पत्रव्यवहार करून आस्मा खान यांच्या इंग्रजी विषयातील तर पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांच्या हिंदी विषयातील एम.फिल. पदवीची खातरजमा करून घेतली. या दोघांनीही आमच्या विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बनावट आणि खोट्या पदव्या तयार केल्या आहेत, असे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने २५ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ईमेलद्वारे कळवले.
आमच्या विद्यापीठात एम.फिल.चा अभ्यासक्रमच चालवला जात नाही. त्यामुळे या दोघांना एम.फिल.ची गुणपत्रिका आणि पदवी जारी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे दोघे कधीही आमच्या विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते आणि नाहीत. या दोघांनी आमच्या विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बनावट व खोट्या पदव्या तयार केल्या आहेत, असेही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने या ईमेलमध्ये म्हटले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून अधिकृतपणे ईमेल पाठवून या दोघांकडील एम.फिल.च्या पदव्या बनावट असल्याची खातरजमा करून दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील उपकुलसचिव (पीएच.डी. विभाग) विजय मोरे यांनी २६ मार्च रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१८(५), ३३६ (३), ३४० (२) आणि ३ (५) अन्वये २६ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे हे करत आहेत. बेगमपुरा पोलिसांनी आस्मा खान हिला ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी तिची सिटी चौक येथील कार्यालयात कसून चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आस्मा खानला अटक करण्यात आली आहे. उद्या ३१ मार्च रोजी रमजान ईदच्या दिवशी आस्मा खानला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पठाण मकसूद खान हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बनावट पदवी प्रकरणात आस्मा खान यांना रविवारी सायंकाळी अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसरा आरोपी पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली.
प्रवेश रद्द करण्याची घोषणा हवेतच!
आस्मा खान व पठाण मकसूद खान या दोघांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बनावट व खोट्या एम.फिल. पदवीच्या आधारे फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश रद्द करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाकडून २६ मार्च रोजीच देण्यात आली होती. परंतु तब्बल पाच दिवस उलटले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे या बनावट एमफिलच्या आधारे फसवणुकीच्या मार्गाने मिळवलेले पीएच.डी.चे प्रवेश रद्द कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे.

