कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी ठोकल्या बेड्या!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बेबंद कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान याला बीएचएमएसची बनावट गुणपत्रिका आणि बनावट पदवी तयार केल्याच्या प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. डॉ. मझहर खानच्या अटकेमुळे विविध अभ्याक्रमाच्या बनावट पदव्यांचे रॅकेटच समोर येण्याची शक्यता आहे.

 कोहिनूर शिक्षण संस्थेचे खुलताबाद येथे कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय आहा. डॉ. मझहर खान हा कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष तर त्याची पत्नी अस्मा खान ही शिक्षण संस्थेची सचिव आहे. डॉ. मझहर खान व त्याची पत्नी आस्मा खान या दोघांच्या विरोधात बीएचएमएसची बनावट पदवी व गुणपत्रक तयार केल्याच्या प्रकरणात कर्नाटकातील बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी बेंगळुरू पोलिसांचे पथक आज छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दाखल झाले होते. या पथकाने सिटी चौक पोलिसांच्या मदतीने डॉ. मझहर खान याला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाचे (आरजीयूएचएस) कुलसचिव डॉ. रियाझ बाशा यांनी बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ७ ऑगस्ट २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरातील गाडे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने आस्मा खान यांचे गुणपत्रक पडताळणीसाठी पाठवले होते. हे गुणपत्रक आरजीयूएचएस विद्यापीठातील नोंदीशी जुळत नसल्याची माहिती ४ सप्टेंबर २०२४ रोजी गाडे हॉस्पिटलला विद्यापीठाने दिली. त्याशिवाय राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगानेही (एनसीएच) बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रासंदर्भात विद्यापीठाकडे विचारणा केली. या प्रमाणपत्रात धारवाड येथील डॉ.बी.डी. जत्ती होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

आरजीयूएचएस विद्यापीठाने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याची पडताळणी करून एनसीएचला उत्तर दिले. त्यानुसार आस्मा खान यांनी विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला नाही, तसेच त्यांना विद्यापीठाने कोणतीही पदवी, गुणपत्रक दिलेले नसल्याचे स्पष्ट केले. आस्मा खान यांच्याकडे असलेली विद्यापीठाची बीएचएमएसची पदवी, गुणपत्रक हे बनावट आहे. त्यात विद्यापीठाच्या लोगोचाही गैरवापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरजीयूएचएस विद्यापीठाने आस्मा खान यांच्याकडे असलेल्या या प्रमाणपत्राचा वैद्यकीय व्यवसासायाठीचा वापरही अवैध ठरवला.

आरजीयूएचएस विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रियाझ बाशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंगळुरूच्या टिळक नगर पोलिस ठाण्यात आस्मा खान आणि मढहर खान या जोडप्याच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विद्यापीठाच्या लोगोचा अवैध वापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्याच्या तपासासाठी बेंगळुरू पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात आले होते. या पथकाने सिटी चौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी यांना मदतीसाठी पत्र दिले. हे पत्र मिळताच परदेशी यांनी पोलिस उपनिरीक्षक अर्जुन मोरे आणि पोलिस अंमलदार राजेंद्र साळुंके यांना पथकासोबत पाठवले. पथकाने एन-११ येथील घरातून दुपारी मझहर खान याला ताब्यात घेतले. याविषयीची नोंद सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. टिळकनगर पोलिसांचे पथक डॉ. मझहर खानला घेऊन बेंगळुरूला गेले आहे. डॉ. मझहर खानच्या अटकेमुळे बनावट पदव्याचे मोठे रॅकेटच बाहेर येण्याची शक्यता आहे.

डॉ. मझहर खान आणि आस्मा खान यांच्या विरुद्ध बोगस पदवी मिळवल्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील जौनपूर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला आहे. डॉ. मझहर खानने जौनपूरच्या वीर बहादूरसिंह विश्वविद्यालयाची बोगस एलएलबीची पदवी मिळवली आणि त्या बोगस पदवीच्या आधारे बार काऊन्सिलचे सदस्यत्व आणि ओळखपत्रही मिळवल्याचे झेबा इद्रिस खान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!