उच्च शिक्षणमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये बोगस प्रवेश दाखवून तयार केल्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि कोहिनूर महाविद्यालयात मिळवली नोकरी!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष असलेल्या कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात बी.ए.ला बोगस प्रवेश दाखवून त्याआधारे शिवाजी विद्यापीठाची बनावट पदवी तयार करून एका बहाद्दराने खुलताबाद येथील कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी व मानसशास्त्र विषयाचा पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून नियुक्ती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोहिनूर शिक्षण संस्थेतील एकापाठोपाठ एक बनावट व खोट्या पदव्यांची प्रकरणे समोर येत असतानाच हे प्रकरण समोर आल्यामुळे बनावट पदव्यांच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २३ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित सहशिक्षकपदावर शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी नियुक्ती मिळवली. स्थानिक निवड समितीमार्फत झालेली ही नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी म्हणजे २३ सप्टेंबर २०२४ रोजीच पूर्ण करून ५ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव पाठवण्यात आला.

हेही वाचाः कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

या स्थानिक निवड समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मझहर खान आणि सदस्य म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान, सहसचिव डॉ. मकसूद खान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे हे होते तर विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. निलेश देगांवकर, डॉ. रमेश देवडे, डॉ. मुंजाजी राखोडे आणि डॉ. तुकाराम मोरे होते. निवड समितीच्या अहवालावर या सर्वांच्याच स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर नियुक्ती मिळवण्यासाठी शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे अध्यक्ष असलेल्या श्री विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात सन २०१६-१७ मध्ये बीए प्रथम वर्षाला प्रवेश दाखवला. सन २०१८-१९ मध्ये त्यांनी बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे दाखवून मार्च-एप्रिल २०१९ मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने बी.ए.ची पदवी प्रदान केल्याचे दाखवले.

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी नोकरी मिळवण्यासाठी सादर केलेल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त केल्या.

शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी सादर केलेली शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे बनावट आणि खोटी असल्याची शंका आल्यामुळे नागराज गायकवाड यांनी कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाशी १७ मार्च २०२५ रोजी पत्रव्यवहार करून शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची खातरजमा करून देण्याची विनंती केली होती.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार

कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने या पत्रावर त्याच दिवशी तातडीने कार्यवाही केली आणि शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन हा विद्यार्थी सन २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत आमच्या महाविद्यालयात प्रवेशितच नाही. त्याच्या गुणपत्रिकेतील विषयाचे कोड आणि महाविद्यालयात शिकवण्यात येत असलेल्या विषयाचे कोड वेगवेगळे आहेत, असे विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी १७ मार्च २०२५ रोजीच नागराज गायकवाड यांना पत्राद्वारे कळवले.

अन् ‘कोहिनूर’चे धाबे दणाणले…

विवेकानंद महाविद्यालयाचे पत्र प्राप्त होताच नागराज गायकवाड यांनी २० मार्च रोजी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून खुलताबादच्या कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी मिळवल्याची तक्रार केली. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी २४ मार्च रोजी कोहिनूर महाविद्यालयाकडे खुलासा मागवला. मात्र  आपल्या आणखी एका चारसौ बीसीचा भंडाफोड होत असल्याचे लक्षात येताच खुलासा मागवणारे हे पत्र प्राप्त होण्यापूर्वीच कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान यांनी २२ मार्च रोजीच शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांना कोणतेही ठोस कारण न देता नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे पत्र दिले आणि त्याच दिवशी तसे विभागीय शिक्षण उपसंचालकांना कळवले. परंतु अचानक नियुक्ती रद्द करण्याचा साक्षात्कार कोहिनूर शिक्षण संस्थेला कसा झाला?, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.

हेही वाचाः बोगस एमफिल पदवीच्या आधारे पीएचडीला प्रवेश मिळवल्याप्रकरणी ‘कोहिनूर’च्या सचिव आस्मा खान गजाआड; रमजान ईद पोलिस कोठडीतच!

शिवाजी विद्यापीठही म्हणते सर्वच पदव्या बनावट

शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विवेकानंद महाविद्यालयातून सन २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावाधीत बी.ए., कोल्हापूरच्या गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयातून सन २०१९-२० ते २०२०-२१ मध्ये एम.ए. (मराठी) आणि सांगलीच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून सन २०२१-२२ ते २०२२-२३ मध्ये बी.एड. पूर्ण केल्याचे भासवून शिवाजी विद्यापीठाच्या बनावट व खोट्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रे तयार केली.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात खंडीभर अभ्यासक्रमांसाठी नेमलेले ढीगभर प्राध्यापक कागदोपत्रीच; ना हजेरी, ना पगाराचा पत्ता, चौकशी समितीने केली पोलखोल!

नागराज गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठाकडेही या सर्वच गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली असता शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांची या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे आमच्या विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाहीत. ही सर्वच कागदपत्रे बनावट आहेत, असे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी कळवले आहे.

सर्वच गुणपत्रिका आणि पदव्या बनावट असल्याचे शिवाजी विद्यापीठाने कळवले ते हेच पत्र.

फौजदारी कारवाई करा

शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांनी शिवाजी विद्यापीठाच्या बनावट व खोट्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे तयार करून कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी मिळवली. कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान व सचिव आस्मा खान यांच्यावर वेगवेगळ्या बनावट व खोट्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रे तयार केल्याचे गुन्हे विविध ठिकाणी दाखल झाले आहेत.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मान्यता अखेर रद्द, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाची कारवाई

शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांची बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे तयार करण्यातही डॉ. मझहर खान यांचा सक्रीय सहभाग असण्याची शक्यता असून या प्रकरणी शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांच्यासह डॉ. मझहर खान व आस्मा खान यांच्याविरुद्धही फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी नागराज गायकवाड यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!