भुजबळांना जेलमधून मीच बाहेर काढले, पण त्यांनी आभारही मानले नाहीत; ओबीसी लढ्याचा जनक मीचः प्रकाश आंबेडकरांचा दावा


पुणेः मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत ओबीसी नेते आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे राजकीय वातावरण तापवले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांविषयी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळांना जेलमधून मीच बाहेर काढले, परंतु त्यांनी कधी आभारही मानले नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात जाऊन म. फुलेंना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मोठी वक्तव्ये केली.

आता मला परत इतिहास सांगत बसायची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा. तुम्हाला कळेल. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल. ओबीसीच्या लढ्याचा जनक मी आहे. छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मी होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मानले नाहीत. मला कोणाची गरजही नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ज्यांचा ओबीसींच्या लढ्याशी संबंध नाही ते…

देशात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणाला लक्ष्य केले जात आहे. ज्यांचा या लढ्याशी संबंध नाही, ओबीसींच्या लढ्याशी संबंध नाही, ते हा लढा आपल्या ताब्यात घेऊन दंगली करतील. या दंगली कशा वाढतील अशा स्वरुपाची वक्तव्ये केली जात आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

३ डिसेंबरनंतर राज्यात दंगली?

सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे. ३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या कुठल्या भागात नरसंहार घडेल. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे, असे आंबेडकर म्हणाले.

आरक्षणाच्या नावाखाली झुंजी

सध्या देशात समाजा-समाजांना आरक्षणाच्या नावाने एकमेकांच्या विरोधात लढवले जात आहे. आणि हे थांबवण्याऐवजी त्यास खतपाणी घातले जात आहे. देशात मुस्लिम आणि ओबीसींना टार्गेट केले जात आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

धार्मिक चष्म्याने पाहण्याची सवयच

तीन दिवसांपूर्वी मुस्लिम संघटनांची मुंबईत बैठक झाली. ८ डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाइनविषयावर आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सामान्य माणसाने विचार करायला हवा. हा मुस्लिमांचा विषय आहे, म्हणून सोडून द्यायचे, असे भाजप सांगत आहे. आपण कुठल्याही प्रश्नाकडे धार्मिक चष्म्यानेच पाहतो. आपल्याला तशीच सवय लावली आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!