नवी दिल्लीः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त सबंध देश अभिवादन करत असतानाच तामिळनाडूतील इंदू मक्कल काची म्हणजेच हिंदू लोकांचा पक्ष या राजकीय पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वादग्रस्त पोस्टर त्या राज्यातील भिंतीभिंतीवर लावून विटंबना केली आहे. या पोस्टरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भगवे वस्त्र परिधान केल्याचे आणि डोक्यावर भस्म लावल्याचे दाखवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘भगव्या’ विचारांचे होते असे दाखवण्याचा हिणकस प्रयत्न बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनीच या हिंदू संघटनेने केला असून त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
इंदू मक्कल काची या हिंदू राजकीय पक्षाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनीच कपाळावर भस्म आणि अंगात भगवे वस्त्र घातलेले बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर तामिळनाडूत विविध ठिकाणी भिंतीवर लावले आहेत. या पोस्टरवर त्या पक्षाचे संस्थापक अर्जुन संपथ आणि पक्षाच्या अन्य नेत्यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. कुंभकोणममध्ये हे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत, असा शहाजोगपणा करत इंदू मक्कल काची पक्षाचे संस्थापक अर्जुन संपथ यांनी त्यांच्या हिणकस कृत्याचे समर्थन केले आहे.
हा हिणकस खोडसाळपणा करणाऱ्या इंदू मक्कल काची पक्षाचे नेते अर्जुन संपथ यांना मद्रास उच्च न्यायालयात तेथील वकिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संपथ यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु वकिलांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली आणि संपथ यांना बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे येथे काही काळ राडा झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती निवळली.
तामिळनाडूतील व्हीसीके या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि खासदार थोल थिरूमालावलन यांनी इंदू मक्कल काची या हिंदू संघटनेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या जनकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून हा फोटो त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया थिरूमालावलन यांनी व्यक्त केली आहे.
इंदू मक्कल काची या हिंदू राजकीय पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांचे हे पोस्टर सोशल मीडियावरही शेअर केले आहे. वाद झाल्यानंतरही अर्जुन संपथ हे त्यांच्या कृतीचे निर्लज्जपणे समर्थन करताना दिसत आहेत. ‘आंबेडकरांनी भगवा रंग घातल्याने त्यांना राग येतो, त्यांनी आंबेडकरांच्या मेहुण्यांना इतके दिवस जातीच्या पिंजऱ्यात ठेवले हे योग्य आहे का?’ असा निर्लज्ज सवाल त्यांनी ट्विट करून केला आहे.