मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापत चाललेले असतानाच हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील चार दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या काळात दक्षिण मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सूर्य आग ओकू लागल्यामुळे तापमानाचा पारा चढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता हवामान विभागाने पुढील चार दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
गुरूवार १८ एप्रिलः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या झळा आणि दमट वातावरण असेल. सायंकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, सोलापूर, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार, १९ एप्रिलः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वातावरण उष्ण आणि दमट असेल. धुळे, नंदूरबार, नाशिक, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
शनिवार, २० एप्रिलः सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रूपर, गडचिरोली जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील तर काही ठिकाणी वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
रविवार, २१ एप्रिलः जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र उष्णता असेल तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.