मुंबईः इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्याधीच फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे हा प्रकार घडला. गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा पहिल्या पेपरपासूनच चुकांमुळे चर्चेत आली असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज गणिताचा पेपर होता. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सकाळी १०.३० वाजेपासूनच काही विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर पहायला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षेपूर्वीच गणिताचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
परीक्षा सुरू होण्याआधीच गणिता पेपर कुणी फोडला? तो व्हायरल कुणी केला? या मागे कोणाचा हात आहे? याचा आता शोध घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चौकशी सुरू केली आहे.
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु त्या सर्व उपाययोजना फोल ठरल्याचे या परीक्षेत होत असलेल्या गैरप्रकारातून स्पष्ट होत आहे.
याआधी परभणी जिल्ह्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी पेपर फोडून उत्तरे लिहिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड येथेही गैरप्रकार झाल्यामुळे शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता गणिताच्या पेपरची दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.
गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सहायक परीरक्षकाकडून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. मात्र त्यानंतर या प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियावर कशी आली? किती विद्यार्थ्यांपर्यंत ही पाने पोहोचली. याची चौकशी करण्यात येत आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या.
बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला प्रश्न विचारण्याऐवजी प्रश्नपत्रिकेत उत्तरेच छापण्यात आली होती. या सावळ्या गोंधळामुळे बारावीची परीक्षा चर्चेत आलेली असतानाच आज गणिताचा पेपर परीक्षेआधीच फुटल्याचे समोर आले आहे.
सरकार झोपले की काय?– अजित पवारांचा सवालः सिंदखेडराजा येथे गणिता पेपर फुटल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सिंदखेडराजा परिसरात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. ते रॅकेट आहे की काय? अभ्यास करणाऱ्या मुलांचे किती वाटोळे आहे. सरकार काय करतेय मला काही कळत नाही. सरकार झोपलेय की काय?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. मग पुन्हा तुम्ही म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचे नुकसान आहे. मध्येही एका पेपरचे तसेच झाले, असेही अजित पवार म्हणाले.