पॉर्न स्टारशी संबंध अंगलट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; वाचा काय आहे नेमके प्रकरण?

वॉशिंग्टनः पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि माजी प्लेबॉय मॉडल करेन मॅकडॉगलला तोंड गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपांसह गंभीर स्वरुपाचे ३४ आरोप ठेवण्यात आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. एखाद्या प्रकरणात अटक झालेले आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

२०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे.

ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स ट्रम्प यांच्याशी असलेले प्रेम प्रकरण विकण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिने या प्रकरणाची कुठेही वाच्चता करू नये आणि तोंड बंद ठेवावे म्हणून ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सला १ लाख ३० हजार डॉलर एवढी प्रचंड मोठी रक्कम दिली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड असे आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी ही रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला दिली. नंतर ट्रम्प यांनी ही रक्कम मायकल कोहेन यांना दिली. कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरुपात करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या द ऍप्रेंटिस या रिऍलिटी शोमध्ये काम देण्याच्या बहाण्याने आपल्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा दावा पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने केला आहे. स्टॉर्मी डॅनियल्स २०१६ पासून तिच्या या प्रेमप्रकरणाची गोष्ट विकण्याचा प्रयत्न करत आहे. २००६ मध्ये या दोघांचाही एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू केल्यानंतर स्टॉर्मी डॅनियल्सने २०१६ मध्ये एबीसी न्यूजशी तिच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात असलेल्या शारीरिक संबंधांबद्दल बोलायला सुरूवात केली होती. त्यामुळे हादरलेल्या ट्रम्प यांनी तिला तोंड बंद ठेवण्यासाठी ही रक्कम दिली.

कोण आहे स्टॉर्मी डॅनियल्स?

स्टॉर्मी डॅनियल्सचा जन्म १७ मार्च १९७९ रोजी अमेरिकेत झाला. स्टेफनी क्लिफॉर्ड असे खरे नाव असलेली स्टॉर्मी ही स्टॉर्मी वॉटर्स नावानेही ओळखली जाते. लुईझियानामध्ये स्टॉर्मीचे बालपण गेले. तिच्या लहानपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिला तिच्या आईनेच वाढवले.

वयाच्या ९ व्या वर्षी स्टॉर्मीचे एका वयस्कर व्यक्तीने लैंगिक शोषण केले होते. पुढे पैसे कमवण्यासाठी ती हायस्कूलमध्ये असताना स्ट्रीप क्लबमध्ये काम करू लागली. २००० मध्ये स्टॉर्मी मुख्य स्ट्रीप डान्सर बनली. या दरम्यान तिची डेव्हॉन मिशेलशी भेट झाली. मिशेलने तिला अडल्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी नेले.

स्टॉर्मी डॅनियल्सने अमेरिकन गर्ल्स-२ या अडल्ट फिल्ममध्ये पहिल्यांदा काम केले. स्टॉर्मीने अनेक प्रसिद्ध मासिकांसाठी शूट केले. यामध्ये प्लेबॉय, हसलर, पेंटहाऊस, हाय सोसायटी, जीक्यू आणि एफएचएम यांचा समावेश आहे.

 ट्रम्प आणि स्टॉर्मीचे अफेअर २००६ मध्ये सुरू झाले. त्यावर्षीच्या उन्हाळ्यात नेवाडा येथे एक सेलिब्रेटी गोल्फ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतच ट्रम्प आणि स्टॉर्मीची पहिल्यांदा भेट झाली.

ट्रम्प यांनी स्टॉर्मीला हॉटेलमधील त्यांच्या रुममध्ये बोलावले. यावेळी ट्रम्प यांनी तिला त्यांच्या रिऍलिटी टीव्ही शोमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. स्टॉर्मीच्या दाव्यानुसार याचवेळी दोघांमध्ये शारीरिक संबंधही आले. त्यावेळी ट्रम्प यांचे वय ६० वर्षे होते तर स्टॉर्मी अवघ्या २७ वर्षांची होती.

 ट्रम्प यांना १ लाख २२ हजार डॉलरचा दंड

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा नॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांना १ लाख २२ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. ट्रम्प यांनी कोर्टात शरणागती पत्करल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला दिली जाईल. या प्रकरणाची सुनावणी आता ४ डिसेंबर रोजी होणार आहे. मॅनहॅटनच्या ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांना गुरूवारी दोषी ठरवून ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या बाजूने मतदान केले होते. ट्रम्प हे २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पुन्हा एकदा तयारी करत असून या खटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!