
भोपाळः उर्दू गझलेला राजवाडे आणि आमीरांच्या मैफलींमधून बाहेर काढून ती सर्वसामान्य लोकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचवणारे आधुनिक गझलांचे उस्ताद महान शायर बशीर बद्र यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. अत्यंत साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्द रचनांमुळे त्यांनी उर्दू आणि गझल प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने उर्दू आणि हिंदी साहित्य विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत.
फारसी आणि अरबी भाषेच्या क्लिष्ट चौकटीतून उर्दू गझल बाहेर काढून साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषेत तिची रचना करून ती सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचे सारे श्रेय बशीर बद्र यांना जाते. कठीण बोजड शब्दांऐवजी सर्वसामान्यांच्या दैनंदिन बोलीभाषेला त्यांनी गझलेत स्थान दिले. त्यामुळेच त्यांच्या गझला केवळ उर्दू साहित्याच्या जाणकारांपुरत्याच सीमीत न राहता सर्वसामान्यांच्या ह्रद्याला भिडल्या. त्यांच्या शायरीमध्ये प्रेम, तनहाई (एकटेपणा), नात्यांमधील कोमलता, विरहाचे दुःख आणि मानवी भावना अतिशय सोप्या भाषेत व्यक्त झालेल्या पहायला मिळतात.
जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जवळपास १४ वर्षे बशीर बद्र यांना डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रासले होते. ज्या महान शायराने जगाला प्रेमाची भाषा शिकवली, ते स्वतःच्याच अनेक लोकप्रिय गझला विसरून गेले होते. परंतु त्यांनी गझलांच्या रुपाने लिहिलेला प्रत्येक शब्द रसिकांच्या मनात युगानुयुगे अमर राहतील.
बशीर बद्र यांची इमकान, आहटें, कुल्लियात-ए-बशीर बद्र आणि उजे अपनी यादों के हे गझल संग्रह प्रचंड लोकप्रिय ठरले. साहित्यातील अमूल्य योगदानासाठी १९९९ मध्ये केंद्र सरकारने बशीर बद्र यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचवर्षी त्यांच्या ‘आस’ या गझल संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
सय्यद मोहम्मद बशीर असे मूळ नाव असलेल्या बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला होता. त्यांना बालपणापासूनच साहित्याची आवड होती. बशीर बद्र यांनी वयाच्या सातव्या वर्षापासूनच शेरोशायरी लिहायला सुरुवात केली होती. बशीर बद्र यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आणि तेथेच त्यांनी उर्दूचे प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे ते मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून रूजू झाले. तेथे त्यांनी १७ वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
१९८७ च्या मेरठ दंगलीत दंगलखोरांनी बशीर बद्र यांचे घर लुटून पेटवून दिले होते. या आगीत त्यांच्या आयुष्याची पुंजी, शैक्षणिक पदव्या आणि अनेक ऐतिहासिक, अप्रकाशित गझला व कवितांची हस्तलिखिते जळून खाक झाली होती. या धक्क्याने बशीर बद्र आतून पूर्णपणे कोलमडले होते. या कठीण काळात त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज त्यांच्या मदतीला धावून आले. विशाल भारद्वाज अनेकदा बशीर बद्र यांच्या घरी जात असत. बशीर बद्र यांच्या तोंडून ऐकलेल्या गझला आणि कविता भारद्वाज यांना तोंडपाठ होत्या. त्यांनी आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर बशीर साहेबांच्या जवळपास ९० टक्के गझला पुन्हा लिहून काढल्या आणि त्यांना एकप्रकारे नवीन जीवन दिले.
मेरठ दंगलीच्या अत्यंत वेदनादायी वळणानंत बशीर बद्र काहीकाळ बरेलीत राहिले आणि नंतर मित्रांच्या सल्ल्याने भोपाळला स्थायिक झाले. भोपाळच्या शांत आणि साहित्यिक वातावरणामुळे त्यांच्या जखमांवर फुंकर घातली गेली. भोपाळमध्येच त्यांची भेट डॉ. राहत यांच्याशी झाली. त्यांच्याशी पुढे त्यांनी विवाह केला. डॉ. राहत यांनी बशीर साहेबांना मेरठमध्ये बसलेल्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढले.
का लावले नावापुढे ‘बद्र’?
सय्यद मोहम्मद बशीर यांनी आपल्या नावापुढे ‘बद्र’ का जोडले? याचे कुतुहल अनेक रसिकांना कायमच राहिले आहे. उर्दू-फारशी शायरीमध्ये ‘बद्र’ शब्दाचा अर्थ होतो पोर्णिमेचा चंद्र. पोर्णिमेचा चंद्र अर्थात पूर्ण चंद्र हे सौंदर्य, चमक आणि उंचीचे प्रतीक मानले जाते. बशीर साहेबांची शायरीही पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच स्पष्ट, चमकदार आणि ह्रदयस्पर्शी होती. त्यामुळेच त्यांनी ‘बद्र’ हे आपले तखल्लुस (टोपणनाव) निवडले. ते त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या रचनांच्या भावार्थाला साजेसेच होते.
बशीर बद्र यांच्या आजरामर शायरी
दुश्मनी जमके करो लेकीन ये गुंजाईश रहे,
जब कभी हम दोस्त बन जाएं तो शर्मिन्दा ना होंI
लोक टूट जातै हैं एक घर बनाने में,
तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने मेंI
उजाले अपनी यादों के हमारे साथ सहने दो,
न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए…I
दुश्मनों के साथ भी मेरे ताल्लुक अच्छे हैं,
मेरी फितरत में नफरत का कोई काम नहींI
कहां से आई ये खुशबू, ये घर की खुशबू है,
इस अजनबी के अंधेरे में कौन आया है…
महक रही है जमीं चांदनी के फूलों से,
खुदा किसी की मोहब्बत पे मुस्कुराया है….
