औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयात कागदपत्रात त्रुटी दाखवून पैसे उकळण्याचा रतीब, तुम्हीही करा बिनधास्त तक्रारी!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): प्रचलित नियम आणि कायदे गुंडाळत नियमबाह्य कामे करून ‘मालामाल’ झाल्याचे आरोप झाल्यामुळे औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर आणि वरिष्ठ लेखापालासह अन्य कर्मचाऱ्यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांनी दिले जात असतानाच या कार्यालयात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांत त्रुटी दाखवून पैसे उकळण्याचा जणू रतीबच घातला जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आता या सगळ्याच हडेलहप्पीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयात अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतनाशी संबंधित व अन्य महत्वाची कामे असतात. परंतु या कार्यालयात कोणत्याही कामासाठी दाखल केलेल्या कागदपत्रात त्रुटी दाखवून पैसे उकळण्याचा रतीबच घातला जात आहे.

हेही वाचाः औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

कारकुनापासून ते कनिष्ठ प्रशासन अधिकारी, प्रशासन अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लेखापाल यांच्यासह औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी कामासाठी आलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ‘शिकार’ समजून अक्षरशः लचके तोडून आर्थिक शोषण करत असल्याच्या तक्रारी आहेत. वर्षानुवर्षे या कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील दलालांची अभद्र युती असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे. या प्राध्यापक/कर्मचाऱ्यांना वेतन बंद करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे तक्रार करायलाही ते धजावत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचाः  उच्च शिक्षण संचालनालयाची विभागीय कार्यालये बनली भ्रष्टाचार, नियमबाह्य कामाचे अड्डे, कोल्हापुरातील कारवाईने पितळ उघडे!

वेतन निश्चिती, भविष्य निर्वाहनिधी, वैद्यकीय बिले, थकीत वेतन अशा प्रत्येक कामासाठी पैसे दिले नाही तर कागदपत्रात त्रुटी दाखवून राजरोसपणे पैसे उकळले जातात, अशाही तक्रारी आहेत. या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन आणि त्यांनी गोळा केलेली संपत्ती व व्यवहाराची प्राप्तिकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी विविध प्राध्यापक संघटनांनी केली आहे.

२५ जुलैला सर्व प्राध्यापक संघटनांचे आंदोलन

औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून भ्रष्ट, हुकुमशाही व बेताल कारभार समोर आला. उच्च शिक्षण संचालकांकडे त्यांच्याबाबत तक्रारी करूनही त्यांच्यावर अद्याप बडतर्फीची कारवाई झालेली नसल्यामुळे सांजेकरांच्या बडतर्फीसह विविध मागण्यांसाठी विविध प्राध्यापक संघटना २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संघटित होऊन सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

हेही वाचाः संस्थाचालकांची फुल्ल टू चाटुगिरी करत प्रशासन अधिकारी सांजेकरांच्या प्राध्यापकांना धमक्या, फुकट पगार घ्यायला लाज…

प्रशासन अधिकारी सांजेकरांना उच्च शिक्षण संचालकांनी कारणे दाखवा नोटीस देऊन अनेक दिवस उलटले तरीही शासनाने त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई न करता मागील तीन महिन्यांपासून केवळ कागदी घोडे नाचवून त्यांच्यावरील कारवाईस हेतुतः विलंब करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्राध्यापक संघटनांनी केला आहे.

हेही वाचाः चिश्तिया महाविद्यालयातील २००१ पूर्वीच्या सर्वच नियुक्त्या नियमबाह्य, सहसंचालक कार्यालयाकडून मूळ मुद्द्याकडेच दुर्लक्ष

औरंगाबाद येथील सहसंचालक व वरिष्ठ लेखापरीक्षक कार्यालयात चालणार मोठा भ्रष्टाचार, येथील भ्रष्टाचारामध्ये सामील असलेले कर्मचारी हे प्रत्येक कामासाठी कागदपत्रात त्रुटी दाखवून राजरोसपणे पैसे उकळण्याचा जणू रतीब सुरू आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या वेतनाची व त्यांनी गोळा केलेल्या संपत्तीची, व्यवहाराची आयकर व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करावी, अशी मागणी प्राध्यापक संघटनांनी केला आहे.

हेही वाचाः उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ‘ठाकुरी जादू’चे प्रयोग सुरेल प्रयोगः न्यायप्रविष्ठ प्रकरणात ‘कॅस’ करण्यास आधी नकार, नंतर होकार!

शासकीय नियमानुसार लोकसेवक कायद्याची अंमलबजावणी करावी. सर्व पत्रव्यवहार वेबसाईट वर टाकावा, कार्यालयाची वेबसाईट अद्ययावत करावी. सांजेकर यांचेवर बडतर्फीची कारवाई करावी, तसेच एकूणच सहसंचालक कार्यालयातील शासकीय काम करण्याच्या भ्रष्ट संस्कृतीची चौकशी करून वर्षानुवर्षे इथेच दलाल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्यातील इतर ठिकाणी बदली करावी, या मागण्यांसाठी विविध प्राध्यापक संघटना २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता औरंगाबादेत धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात बामुक्टो, स्वाभिमानी मुप्टा, परिवर्तन ग्रुप, भारतीय पिछडा(ओबीसी) शोषित संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत.

हेही वाचाः प्राचार्य अग्नीहोत्री प्रकरणात ‘साप सोडून भुई धोपटण्याचा’ सहसंचालकांचा प्रयत्न, एचटीई सेवार्थसाठी जोरदार आटापिटा!

तुम्हालाही छळले का? करा न्यूजटाऊनकडे तक्रारी

औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील कारकुनापासून ते कनिष्ठ प्रशासन अधिकारी, प्रशासन अधिकारी, सहसंचालक, वरिष्ठ लेखापाल आदी सर्वच कर्मचारी या कार्यालयात कामानिमित्त येणारे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करतात. पैसे दिल्याशिवाय एकही कागद हालत नाही. या आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या औरंगाबाद विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यासह m.newstown@gmail.com या ईमेलवर किंवा 9823427325 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्या तक्रारींची योग्य ती दखल घेण्यात येईल आणि तुमच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!