जालनाः येथील औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ४ कामगार होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटात किमान २० ते २२ कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आज शनिवारी दुपारच्या सुमारास गजकेसरी स्टील कंपनीच्या भट्टीतील केमिकल अंगावर पडल्याने त्या ठिकाणी काम करणारे कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांना दिली. तर भट्टी फुटल्याने भट्टीतील केमिकल कामगारांवर उडाल्यामुळे काही कामगार जागीच ठार झाल्याची भीती स्थानिक कामगारांनी व्यक्त केली आहे.
गजकेसरी कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होताच तातडीने कंपनी बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाइल हिसकावून घेण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी कामगारांची गर्दी जमली. जखमी झालेल्यांपैकी चार कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) हलवण्यात आले आहे. इतर कामगारांवर जालना येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस उपअधीक्षक पियुष निपाणी यांच्यासह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
जालन्यात २० ते २५ स्टील कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये राज्याबाहेरील सुमारे २० ते २५ हजार कामगार काम करतात. या कंपन्यांमध्ये अनेकदा स्फोट होत असतात. त्यात या कामगारांना अपंगत्व येते तर काही कामगारांना जीवही गमवावा लागतो. मात्र या कंपन्यांमधील दुर्घटनांची माहिती लपवली जाते, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.