मुंबईः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना उधाण आले असतानाच हा मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्री बनले आहेत. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष करण्यात आले असून या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराच्या या चर्चांना नेहमीप्रमाणे दुजोरा देत आहेत तर मंत्रिपद मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक आमदारांकडून आपलाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे दावे केले जात आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले होते. पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या स्थापनेला अडीच वर्षे झाल्यानंतर ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांना आता त्या पाठिंब्याचे फळ मिळाले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद देऊन बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
शिंदे- फडणवीस सरकारची स्थापना होऊन ११ महिने उलटले आहेत. परंतु तरीही या सरकारचा अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार खोळंबल्याचे सांगण्यात येत होते. या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत आणि मंत्रिमंडळात आपलाच समावेश होईल, असे दावेही अनेक आमदारांकडून केले जात आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितल्याने विस्ताराच्या बातम्यांना अधिक बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत. जे मंत्रिपद मिळेल, त्याला पूर्ण न्याय देऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर माझे नाव दरवेळी चर्चेत असते, असे सूचक वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केले आहे.
या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पूर्ण तयारी आहे, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.
मंत्रिपद मिळेल की नाही….?
या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर ते म्हणाले की, जेवणाचे आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरे नसते. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाहीतरीही कामे करतोय. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळाला पाहिजे, ही जनतेची मागणी आहे, असे बच्चू कडू म्हणाले. या विस्तारात मंत्रिपद मिळे की नाही, हे सांगता येत नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिला होता, ते आपला शब्द पाळतील, असे बच्चू कडू म्हणाले.
मंत्रिपद मिळेल, या अपेक्षने शिंदे-फडणवीसांसोबत गेलेले बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जाहीरपणे भूमिका मांडल्या आहेत. नाराजीही व्यक्त केली आहे. मंत्रिपदाबाबत ते उत्सूक असल्याचेही अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. त्यांची ही नाराजी दूर करत मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले आणि या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार नाही, हेही आता स्पष्ट झाले आहे.
प्रताप सरनाईक म्हणतात, मलाही शब्द दिलाय…
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे हे आम्हाला कोटासह मंत्रिपद देतील. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल, सरनाईक म्हणाले. ते ठाण्यातील ओवळा-माजीवडाचे आमदार आहेत.
संजय शिरसाटांचे नावही चर्चेत
एकीकडे प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा केलेला असतानाच दुसरीकडे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनाही नव्या मंत्रिमंडळ विस्तार स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शिरसाटांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘मला बातम्या पाहून असे वाटत होते की मंत्रिमंडळातील माझे स्थान लटकलेल्या अवस्थेत आहे,’ असे म्हटले आहे.