धुळेः अयोध्येत ज्या जागेवर राम मंदिर बांधण्यात आले आहे, तेथे आधी बुद्ध विहार होते. उत्खनन केले तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशीद आणि राम मंदिराच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येत्या २२ जानेवारीला या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हा दावा केला आहे.
अयोध्येत तिथे राम मंदिर आहे, तिथे आधी बुद्ध विहार होते. उत्खनन केले तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशीद आणि राम मंदिर यांच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीला पाच एकर जागा दिली आहे आणि आता रामाचे मंदिरही अयोध्येत उभे राहिले आहे, असे आठवले म्हणाले.
बाबरी मशीद आणि राम मंदिर या वादात पडून समाजात फूट पाडणे योग्य नाही, म्हणून आम्ही त्यात पडलो नाही. पूर्वी तया ठिकाणी बुद्ध विहार असल्याचे पुरावे सापडले आहेत. उत्खननात बुद्ध विहाराचे अवशेष सापडले आहेत. या गोष्टीला अडीच हजार वर्षे झाली आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आले, असा दावा आठवले यांनी केला आहे.
अडीच हजार वर्षांपूर्वी सर्वात आधी अयोध्येत भगवान गौतम बुद्धांचे विहार होते. त्यानंतर तेथे प्रभू रामचंद्राचे मंदिर आले. आता अयोध्येत बुद्ध विहार व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू, असेही आठवले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुस्लिम समाजाने शांतता ठेवली. बंधुभाव कायम रहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही आठवले म्हणाले.