औरंगाबादः औरंगाबाद शहर पोलिस दलातील एसीपीने महिलेशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण ताजे असतानाच एका पोलिस उपनिरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत तो रहात असलेल्या कॉलनीतीलच महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून त्या पोलिस उपनिरीक्षकाची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षकाने त्याच्याच कॉलनीतील महिलांशी अश्लील वर्तन केल्याच्या या प्रकारामुळे पोलिस जनतेचे रक्षक आहेत की भक्षक? असा सवाल केला जाऊ लागला आहे.
पोलिस उपनिरीक्षक अनिल बोडेले हे जवाहरनगर परिसरातील मयूरबन कॉलनीतल राहतात. बोडले यांनी मद्यधुंद अवस्थेत या परिसरातील काही महिलांची छेड काढली. त्यांच्याशी महिलांच्या घराच्या भिंतीवर चेंडू मारत ते अश्लील वर्तन करत होते. अनिल बोडेले यांनी अश्लील नजरेने तो महिलांकडे पाहून त्यांना त्रास देणे सुरू केले. सोसायटीतील अनेक महिलांशी त्यांनी हा प्रकार केला. या महिलांनी एकत्र येऊन अनिल बोडेलेंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता बोडेले यांनी महिलांना शिविगाळ करत धमकी दिली. बोडेले यांनी मद्यधुंद अवस्थेतच महिलांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचाही आरोप आहे. गुरूवारी रात्री हा प्रकार घडला.
अनिल बोडेले यांनी काढलेली छेड आणि दिलेल्या त्रासामुळे या परिसरातील महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी आपला मोर्चा जवाहरनगर पोलिस ठाण्याकडे वळवला. अनिल बोडेलेंवर कारवाई करा, या मागणीसाठी महिलांनी रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला.
अश्लील वर्तन आणि छेडछाडीला बळी पडलेल्या महिला जवाहरनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या असतानाच पोलिस उपनिरीक्षक अनिल बोडेले तेथे आले. त्यांनी मयूरबन कॉलनी परिसरातील नागरिकाला व्हिडीओ कॉल करून महिलांना अश्लील भाषेत जाब विचारला. अनिल बोडेले हे शुद्धीवर नसल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले.
प्रकरण पांगत असल्याचे पाहून जवाहरनगर पोलिसांनी अनिल बोडेले यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले. गुरूवारी रात्री उशिरा महिलांनी अनिल बोडेलेंच्या विरोधात तक्रार दाखल केली. जवाहरनगर पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतली आहे.
यापूर्वी मागच्याच महिन्यात औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी मद्यधुंद अवस्थेत परिचित महिलेची छेड काढल्याचे प्रकरण समोर आले होते. ढुमे हे मद्यधुंद अवस्थेत उत्तररात्री त्या महिलेच्या घरी जाऊन तिच्या बेडरूममधील वॉशरूम वापरू देण्याचा आग्रह धरत होते. तिच्या कुटुंबीयांना धमकावून मारहाणही केली होती. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस उपनिरीक्षक अनिल बोडले यांचा हा कारनामा समोर आला आहे.
मयूरबन कॉलनीत अनिल बोडेले जेव्हा शिविगाळ करत होते, त्या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही अनिल बोडेले यांनी सोसायटीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला होता. याबाबत सोसायटीच्या वतीने त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही बोडेले यांच्या वर्तनात काहीही फरक पडला नाही आणि गुरूवारी रात्रीचा हा प्रकार समोर आला. त्यामुळे औरंगाबादेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.