नितीन वैद्यः समतेच्या मार्गावरील कार्यकर्ता सिनेनिर्माता


डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, पूर्वाश्रमीचे पत्रकार नितीन वैद्य यांना उदगीर येथे आज होणार्‍या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबईचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्या निमित्त वैद्य यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख…

अंकुश गायकवाड, माजी प्रदेश कार्यवाह, छात्रभारती.

उच्च दर्जाची व्यावसायिकता, त्यातही टीव्ही, चित्रपटासारखे झगमगाटी जग. त्यात राहूनही लाखांत एखादाच व्यक्ती सामाजिक कार्यात राहतो. तेही हौशी समाजकार्य नव्हे, तर अत्यंत कर्मठ व आजघडीला पिछेहाट होत असलेली समाजवादी चळवळ! हा तोल प्रसिद्ध टीव्ही मालिका व चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना चांगलाच साधता आला आहे. संघटनांपासून चार हात दूर राहणाऱ्या क्षेत्रातील वैद्य सध्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नितीन  वैद्य यांनी निर्माण केलेल्या टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये संवेदनशीलता व सामाजिक भान जाणवते. त्यांची पत्रकारितेतील कारकीर्द ही प्रदीर्घ व दैदीप्यमान राहिली आहे.

वैद्य यांनी १९८५  मध्ये दैनिक सकाळमधून वार्ताहर म्हणून सुरुवात केली. १९८८ मध्ये ते महाराष्ट्र टाइम्समध्ये दाखल झाले. गोविंद तळवळकर व कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पत्रकारितेला पैलू पडले. १९९१ मध्ये ‘मटा’ ने त्यांची दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. तेथून त्यांनी केलेली राष्ट्रीय पत्रकारिताही गाजली.

वैद्य यांनी १९९८ मध्ये मुद्रित माध्यमातून टीव्ही पत्रकारितेत प्रवेश केला. टीव्ही पत्रकारिता सुरू केलेल्या पहिल्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. झी न्यूजचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून त्यांचा टीव्हीवरील प्रवास सुरू झाला. पहिले मराठी खासगी चॅनल तारा टीव्ही त्यांच्याच नेतृत्वात सुरू झाले. ते पुन्हा झी माध्यम समूहात परतले. सुरुवातीच्या काळात अल्फा या ब्रॅण्डनेमने सुरू झालेल्या वाहिन्यांचे नामकरण नंतर झी असेच करण्यात आले. त्यांनी निर्माण केलेल्या अल्फा व झी मराठी वरील दर्जेदार मालिकांनी रसिकांच्या मनावर राज्य केले.

मराठी, गुजराथी, पंजाबी व बंगाली चॅनलचे ते प्रमुख होते. वैद्य यांच्या नेतृत्वात झी समूहाची चित्रपट निर्मिती कंपनी झी टॉकीज झाली. झी चे उपाध्यक्ष ते चीफ बिझनेस हेड ही पदेही त्यांनी भूषविली. त्यानंतर स्टार प्लस या वाहिनीचे बिझनेस हेड म्हणूनही काम केले. त्यानंतर मात्र स्वतःची दशमी क्रिएशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेने निर्माण केलेल्या मराठी व टीव्ही मालिकांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’, ‘सावित्रीज्योती’, ‘अहिल्याबाई होळकर’ या त्यांच्या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या.

मुळात नितीन वैद्य यांची जडणघडण राष्ट्र सेवा दलात झालेली असल्याने या महामानवांवर मालिका निर्माण करण्याचे धाडस त्यांनी केले. सध्याच्या तरूण पिढीत वाचण्याची सवय कमी होत आहे. या नवीन पिढीचे टीव्ही व मोबाईल हे माध्यम आहे. वैद्य यांनी या नव्या पिढीच्या माध्यामातून या महामानवांचे कार्य घराघरात पोहोचवले.

विशेषतः वाचनाची सवय नसलेल्या, वाचनासाठी वेळ नसलेल्या व अशिक्षित समूहापर्यंत या महामानवांचे चरित्र पोहोचवण्याचे क्रांतिकारक कार्य त्यांनी केले आहे. याच कार्याबद्दल डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. वैद्य यांनी अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. सध्या सुरू असलेली ‘लोकमान्य’ या टिळकांवरील मालिकेची निर्मितीही त्यांचीच.

नितीन वैद्य हे लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख वाटा राहिला आहे. त्यांनी १९८० च्या दशकात अनेक आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीचे ते मुंबई विभागाचे सचिव होते. व्यावसायिक कालखंडात त्यांनी चळवळी सोबतचे नाते तोडले नाही. उलट ते अधिक घट्ट केले. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, अंनिस, नर्मदा बचाव आंदोलन यासह कष्टकरी व शोषितांच्या चळवळींना त्यांची मदत राहिली आहे. ते राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त होते. या पुरस्कारानिमित्त त्यांच्या समतेच्या मार्गावरील वाटचालीस शुभेच्छा!

प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्याविषयी थोडेसे…

डॉ. ना. य. डोळे हे उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे स्थापनेपासून निवृत्तीपर्यंत २८ वर्षे प्राचार्य होते. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागातील शेकडो विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. थोर समाजवादी नेते, संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष साथी एस. एम. जोशी यांच्या सूचनेनुसार ते मराठवाड्यात आले. डोळे यांच्या वैचारिक मार्गदर्शनामुळे या परिसरातील चळवळींना मोठे बळ मिळाले. ते राष्ट्र सेवा दलाचे सैनिक व छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सल्लागार होते. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळींना त्यांचा मोठा आधार वाटत असे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!