एकच व्यक्ती दोन ठिकाणी पूर्णवेळ प्राध्यापक कशी?, सिल्लोड शिक्षण संस्थेला विद्यापीठाची नोटीस; तातडीने खुलासा करण्याचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव राहुल जनार्दन म्हस्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची दिशाभूल करून आपल्याच संस्थेच्या दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ सहायक प्राध्यापक आणि प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता मिळवल्याचा गौप्यस्फोट न्यूजटाऊनने केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यापीठ प्रशासनाने सिल्लोड शिक्षण संस्थेला नोटीस बजावून तातडीने खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा दर्जा असलेल्या सिल्लोड शिक्षण संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दोन स्वतंत्र महाविद्यालये चालवली जातात. यापैकी जाफ्राबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे शासन अनुदानित आहे. तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालय हे कायम विनाअनुदानित तत्वावर चालवले जाते.

आवश्य वाचाः विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करून सिल्लोड शिक्षण संस्थेच्या राहुल म्हस्केंनी मिळवल्या दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ मान्यता!

सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव असलेले राहुल जनार्दन म्हस्के यांनी विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करत जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयात संगणशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आणि याच संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नालंदा मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर सायन्स महाविद्यालयातही सहायक प्राध्यापक आणि प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता मिळवल्याचा गौप्यस्फोट आज न्यूजटाऊनने पुराव्यानिशी केला.

हेही वाचाः जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने दडपले प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेचे १७ लाख ५९ हजार ७३१ रुपये!

न्यूजटाऊनच्या या गौप्यस्फोटमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एकच व्यक्ती दोन स्वतंत्र महाविद्यालयात पूर्णवेळ सहायक प्राध्यापक कशी? विद्यापीठ प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून राहुल म्हस्के यांनी दोन स्वतंत्र आस्थापनांवर पूर्णवेळ सहायक प्राध्यापक म्हणून मान्यता मिळवली कशी? असे अनेक प्रश्न उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले आहेत.

हेही वाचाः सिद्धार्थ महाविद्यालयाने परत केले माजी प्राचार्यांच्या वेतनाचे १० लाख ३० हजार रुपये, न्यूजटाऊनच्या दणक्याने घश्यातली रक्कम बाहेर!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने न्यूजटाऊनच्या या वृत्ताची तातडीने दखल घेतली आणि सिल्लोड शिक्षण संस्थेला आजच नोटीस बजावली आहे. राहुल म्हस्के हे आपल्या शिक्षण संस्थेच्या दोन स्वतंत्र आस्थापनावर पूर्णवेळ सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत कसे? याचा तातडीने खुलासा करावा, अन्यथा नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाच्या वतीने बजावलेल्या या नोटिशीत म्हटले आहे.

…ही तर शुद्ध ‘चारसौ बीसी

नियमानुसार एका व्यक्तीला एकावेळी एकाच आस्थापनेवर पूर्णवेळ कार्यरत रहाता येते आणि एका व्यक्तीला एकाच महाविद्यालयाच्या आस्थापनेवर मान्यता देता येते. असे असतानाही राहुल म्हस्के यांनी विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल करून आपल्याच संस्थेच्या दोन स्वतंत्र आस्थापनांवर पूर्णवेळ मान्यता मिळवणे ही शुद्ध चारसौ बीसी आहे. राहुल म्हस्के प्रकरणात सिल्लोड शिक्षण संस्थेकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० नुसार कारवाई केली जाण्याची शक्यताही आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!