विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करणारा निलंबित प्रा. अशोक बंडगरची नाट्यशास्त्र विभागात लुडबुड; प्राध्यापक-विद्यार्थी वैतागले!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला नाट्यशास्त्र विभागाचा प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर निलंबित असूनही त्याने नाट्यशास्त्र विभागात येऊन अनधिकृत लुडबुड सुरू केली आहे. विभागातील केबिनसह अन्य संसाधनाचाही वापर बंडगरकडून केला जात आहे. दरम्यान, बेगमपुरा पोलिसांत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्रा. बंडगरला निलंबित केले खरे, परंतु तीन महिने उलटूनही त्याच्या विभागीय चौकशीला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून प्रा. बंडगरला सॉफ्ट कॉर्नर दिला जात आहे की काय? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.

वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगाच हवा या वेडाने झपाटलेल्या प्रा. डॉ. अशोक बंडगरच्या विरोधात त्याच्या पत्नीसह २५ एप्रिल रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९, ११४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बंडगर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह फरार झाला.  त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्रा. बंडगरला २६ एप्रिल रोजी निलंबित केले.

विद्यापीठ प्रशासनाने जारी केलेल्या निलंबन आदेशाचे प्रा. अशोक बंडगरने हा आदेश जारी झाल्यापासूनच उल्लंघन केले. विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता परस्पर मुख्यालय सोडून बंडगर फरार झाला होता. आपल्याविरुद्ध स्वतंत्रपणे विभागीय चौकशी केली जाईल, असेही या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले होते. परंतु तीन महिने उलटले तरी विद्यापीठ प्रशासनाने बंडगरची विभागीय चौकशीच सुरू केलेली नाही.

दरम्यान, पीडित विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे केलेल्या तक्रारीच्या सुनावणीसाठी बंडगरला वारंवार नोटिसा पाठवूनही तो विशाखा समितीसमोर हजर झाला नाही. त्यामुळे बंडगरची वाट पाहून पाहून थकलेल्या विशाखा समितीने अखेर आपला अहवाल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सादर केला. त्या अहवालावर कुलगुरूंकडून कारवाई होणे अद्याप बाकी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रा. अशोक बंडगर व त्याच्या पत्नीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर जवळपास अडीच-तीन महिने फरार असलेला बंडगर विद्यापीठ परिसरात अवतरला. कुख्यात गुन्हेगारांच्या सहजपणे मुसक्या आवळणाऱ्या औरंगाबाद पोलिसांना बंडगर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत सापडलाच नाही.

अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर अवतरलेला बंडगर निलंबित असतानाही नाट्यशास्त्र विभागात जात आहे. केबिनमध्ये बसून विद्यापीठाच्या अन्य संसाधनांचा वापर करत आहे. तेथील प्राध्यापक/विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बंडगरच्या त्रासाला नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक- विद्यार्थी वैतागले आहेत. याबाबतची तक्रार करण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने अशोक बंडगरला नाट्यशास्त्र विभागात जाऊन लुडबुड न करण्याची सक्त ताकीद दिल्याचे समजते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!