बीडचा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने दिल्लीत ठोकल्या बेड्या


मुंबईः दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी बीडचा वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या दोन दिवसांच्या कोठडी पाठवले.

वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे करणारा बीडचा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेविरुद्ध बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या फिर्यादीवरून रणजित कासलेविरुद्ध सामाजिक शांतता भंग करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एक गुन्हा तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक भाष्य केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्याप्रकरणी रणजित कासलेला निलंबित करण्यात आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करून रणजित कासलेने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. रणजित कासलेवर यापूर्वीही बीड, परळी, अंबाजोगाई आणि मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात १८ एप्रिल रोजी त्याला अटकही झाली होती. अटकेच्या कारवाईपूर्वी रणजित कासलेला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. आठवडाभरापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता.

रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे केलेले आहेत. निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून आपल्या खात्यावर १० लाख रुपये टाकण्यात आल्याचा दावा करून रणजित कासलेने खळबळ उडवून दिली होती. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी आपल्याला ५ ते ५० कोटी रुपये देऊ केले होते, असा दावाही त्याने केला होता.

जामीन मिळाल्यानंतरही रणजित कासलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावे करणे सुरूच ठेवले होते. शनिवारी (२४ मे) रोजी रणजित कासलेने नवा व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराड प्रकरणी मोठे दावे केले होते. वाल्मिक कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो. त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते. वाल्मिक कराड स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीनमधून दरमहा तब्बल २५ हजार रुपयांची खरेदी करत आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, असा दावा रणजित कासलेने या व्हिडीओत केला होता.

इतर कैद्यांना तुरुंगात केवळ पांघरण्यापुरते कपडे पुरवले जात असताना वाल्मिक कराडला एक नव्हे तर तब्बल सहा ब्लँकेट दिले गेले आहेत. या ब्लँकेटचा वापर वाल्मिक कराड गादीसारखा करत आहे, असा दावाही रणजित कासलेंनी याच व्हिडीओत केला होता. त्याच्या या दाव्यानंतर बीडचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!