Video: अनुसूचित जमातीच्या महिला उपकुलसचिवाने बदलीनंतर स्वतःच्या डोक्यावर वाहून आणले कार्यालयीन बाडबिस्तार, ‘डॉ. बामु’मधील धक्कादायक प्रकार!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतर विनंती करूनही कुलसचिवांनी शिपाई उपलब्ध करून न दिल्यामुळे अनुसूचित जमातीच्या महिला उपकुलसचिवाला जुन्या विभागातील कार्यालयीन बाडबिस्तार नवीन विभागात स्वतःच्या डोक्यावर वाहून आणावे लागले. हा धक्कादायक प्रकार आज (२४ जून) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला. अनुसूचित जमाती प्रवर्गातील एका महिला अधिकाऱ्याशी विद्यापीठ प्रशासनाने केलेला हा व्यवहार उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेमलता गुलाबराव ठाकरे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलचिवपदावर कार्यरत आहेत. त्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. त्या परीक्षा व मूल्यमापन विभागात कार्यरत होत्या. परीक्षा व मूल्यमापन विभागातून त्यांची बदली १९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीतील पदव्युत्तर विभागात करण्यात आली. तेथून अवघ्या तीन महिन्याच्या आतच म्हणजे ३ एप्रिल २०२५ रोजी त्यांची बदली मुख्य प्रशासकीय इमारतीतीलच अभ्यासक्रम विभागाच्या उपकुलसचिवपदी करण्यात आली.

हेमलता ठाकरे या राजर्षि शाहू महाराज भवनात असलेल्या परीक्षा व मूल्यमापन विभागातून मुख्य प्रशासकीय इमारतीत आल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन इमारतीतील दालन हे परीक्षा विभागाचे असल्यामुळे हे दालन परीक्षा विभागाकडे हस्तांतरित करून त्याचा ताबा आठ दिवसांच्या आत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडे द्यावा, अशी नोटीस प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ११ जून रोजी ठाकरे यांना बजावली.

ही नोटीस मिळाल्यानंतर ठाकरे यांनी १७ जून रोजी प्रभारी कुलसचिव डॉ. अमृतकर यांना पत्र लिहून परीक्षा व मूल्यमापन विभागातील दालनात असलेले दस्तऐवज व वस्तू आणण्यासाठी शिपाई उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. परीक्षा विभागातील दालनात माझे कार्यालयाशी संबंधित असलेले दस्तऐवज आणि कार्यालयाशी वैयक्तिक केलेल्या पत्रव्यवहाराचे सर्व मूळ दस्तऐवज व इतर आवश्यक वस्तू आहेत. बदली झाली त्याच दिवशी मी हे सर्व दस्तऐवज बांधून ठेवले आहेत. परीक्षा विभागात असताना परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रभारी संचालकांनी आपल्याला शिपाई उपलब्ध करून दिलेला नाही. मुख्य प्रशासकीय इमारतीत आल्यानंतरही आपल्याला आजपर्यंत शिपाई उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे शिपाई उपलब्ध करून दिल्यास हे दालन तत्काळ रिकामे करून देईन, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

हेही वाचाः अकृषी विद्यापीठांचे शासनावरील अवलंबित्व कमी होणार, आता विद्यापीठांत पडणार भागीदार आणि गुंतवणुकदारांची पावले?; अभ्यास समितीचा अहवाल सादर

प्रभारी कुलसचिवांना हे पत्र दिल्यानंतरही हेमलता ठाकरे यांना शिपाई उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यांनी प्रभारी कुलसचिवांची भेट घेऊन शिपाई उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी दाद दिली नसल्यामुळे हेमलता ठाकरे यांनी आस्थापना विभागाचे उपकुलचिव डॉ. गणेश मंझा यांच्याकडेही शिपाई उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनीही कोणतीच कार्यवाही केली नाही.

विद्यापीठ प्रशासन शिपाई उपलब्ध करून देईना आणि प्रभारी कुलसचिवांनी नोटीस बजावून दालन रिकामे करण्यासाठी दिलेल्या मुदतीत म्हणजेच २५ जूनपर्यंत दालन रिकामे करून त्याचा ताबा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडे दिला नाही तर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार असल्यामुळे हेमलता ठाकरे या आज स्वतःच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या जुन्या दालनात गेल्या. तेथून त्यांनी कार्यालयीन दस्तावेजाचे दोन वजनदार गाठोडे उचलले. सुरूवातीला एक गाठोडे पाठीवर आणि दुसरे गाठोडे हातात घेऊन त्या चालत निघाल्या. परंतु हाताल ओझे झेपेनासे झाल्यामुळे त्यांनी दोनपैकी एक गाठोडे चक्क डोक्यावर घेतले आणि चालत चालतच त्या परीक्षा विभागातून मुख्य प्रशासकीय इमारतीत पोहोचल्या.

हेही वाचाः प्रभारी कुलगुरूंचा वादग्रस्त निर्णयः ‘लाचखोरी’मुळे डीनपदावरून हटवलेले अमृतकरांच्या तोंडी कुलसचिवपदाच्या ‘अमृता’चा चमचा!

परीक्षा विभाग ते मुख्य प्रशासकीय इमारत यातील अंतर बरेच आहे. उपकुलसचिवपदावर असलेली एक महिला अधिकारी डोक्यावर कार्यालयीन दस्तऐवजाचे गाठोडे वाहून नेत असल्याचे पाहून विद्यापीठ परिसरात विविध कामानिमित्त आलेले विद्यार्थी व प्राध्यापकही आश्चर्यचकित झाले. हेमलता ठाकरे या हे ओझे घेऊन परीक्षा विभागातून मुख्य प्रशासकीय इमारतीत पोहोचेपर्यंत त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या एका महिला अधिकाऱ्याशी विद्यापीठ प्रशासनाने केलेला हा व्यवहार चर्चेचा विषय बनला आहे. पहा व्हिडीओः

कुलगुरूंनीही धमकी दिलीः ठाकरे

प्रभारी कुलसचिव डॉ. अमृतकर यांच्याकडे शिपाई उपलब्ध करून देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी माझा काय संबंध म्हणत अंग झटकले. आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची भेट घेऊनही शिपाई देण्याची विनंती केली. त्यांनीही ‘ज्यांना शिपाई पुरवण्याचे टेंडर दिले आहे, ते फोन उचलत नाहीत. ते आमच्याशी बोलतच नाहीत, मग तुम्हाला शिपाई कसा उपलब्ध करून द्यायचा?’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली, असे हेमलता ठाकरे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.

माझ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. त्याबाबत मी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागितली आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनीही काही दिवसांपूर्वी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले आणि उभे करून तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू अशी धमकी दिली. प्रकुलगुरू आणि परीक्षा मंडळाच्या प्रभारी संचालक याचे साक्षीदार आहेत. माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बेगमपुरा पोलिसांत दोनवेळा तक्रारी दिल्या पण त्यांनी दखल घेतली नाही. मग मी न्याय कोणाकडे मागायचा?, असा उद्विग्न सवाल हेमलता ठाकरे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!