अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार, व्यंगात्मक विनोदामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण: सुप्रीम कोर्ट; खा. प्रतापगढींविरुद्धचा एफआयआर रद्द
नवी दिल्लीः अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलाधार आहे. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना आवडले नाहीत तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर व्हायलाच हवा. कोणतेही साहित्य मग ते कविता, नाट्य, चित्रपट, व्यंग किंवा कला असो त्यातून मानवाचे जीवन अधिक अर्थपूर्ण होते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केला आहे.
काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर ‘ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता शेअर केली होती. या कवितेतून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देण्यात आल्याचे तसेच त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात ३ जानेवारी रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला...