आता इंटरनेटशिवाय मोबाइल स्क्रीनवर पाहता येणार हवी ती टीव्ही चॅनेल्स, डीटूएम सेवा लवकरच!
नवी दिल्लीः मोबाइल फोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हल्ली बरीचशी कामे मोबाइल फोनवर चुटकी सरशी होऊ लागली आहेत. मनोरंजनाबरोबरच दैनंदिन कामजाततही महत्वाची भूमिका बजावत असलेल्या मोबाइल फोनवर सरकार आता आणखी एक नवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहे. डीटूएचच्या माध्यमातून घरातील टीव्हीवर चॅनेल्सचे प्रसारण होते. त्याच धर्तीवर आता डायरेक्ट टू मोबाइल सेवा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनेटशिवाय कोणतेही टीव्ही चॅनेल्स थेट मोबाइल फोनवरच पाहता येणार आहेत.
सध्या मोबाइल फोनवर मनोरंजनाचे व्हिडीओ अथवा कोणताही कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेट पॅक टाकणे अनिवार्य आहे. या इंटरनेट पॅकच्या माध्यमातून टेलिकॉम कंपन्या मोठा नफा कमावतात. परंतु आता मोबाइल फोनवर इंटनेटशिवाय टीव्ही पाहण्याची सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
...