नाशिकः बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. येथील गावजेवणात विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेगळे अन्न शिवजवले जाते, त्यांची पंगतही वेगळी बसते आणि इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत बसवली जाते. घटनात्मकदृष्ट्या जातीभेद पाळण्यावर निर्बंध असतानाही हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
माणसामाणसात भेदभाव करणारी ही पद्धत सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी असल्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. अंनिसच्या या तक्रारीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार महादेवी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गावजेवणाच्या पंगती आयोजित केल्या जातात. चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतेची धार्मिक कर्मकांडे केल्यानंतर हे गावजेवण आयोजित केले जाते. या गावजेवणासाठी संपूर्ण गावातून वर्गणी आणि खाद्यसामग्री गोळा केली जाते.
संपूर्ण त्र्यंबकेश्वरातून गोळा केलेली वर्गणी आणि अन्नधान्यातून होणाऱ्या या गावजेवणात मात्र एका विशिष्ट जातीचे लोक आणि त्यांच्या कुटंबीयांसाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. त्यांची जेवणाची पंगतही वेगळी बसते. त्यांच्या पंगतीत इतर बहुजन समाज घटकांना बसू दिले जात नाही. इतर बहुजन समाज घटकांसाठी वेगळे अन्न शिवजवले जाते आणि त्यांना वेगळ्या पंगतीत बसवून जेवण वाढले जाते.
सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी महादेवी ट्रस्टकडून मानवतेला काळीमा फासणारा जातीभेदाचा हा प्रकार राजरोसपणे वर्षानुवर्षे सुरू आहे. तेथील काही स्थानिक नागरिकांनी ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर अंनिसने त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांकडे रितसर निवेदन देऊन हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेला हा प्रकार भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारा आहे, असे अंनिसने म्हटले आहे.
गावातील सर्वांकडून वर्गणी जमा करून गावजेवण दिले जात असेल तर तेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांसाठी एकाचवेळी अन्न शिजवून सर्व गावकऱ्यांनी एकाच पंगतीत बसवून जेवण करायला हवे. धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यात अन्य ठिकाणीही जर असे घटनाबाह्य प्रकार सुरू असतील तर ते कायमस्वरुपी बंद करण्यात यावेत आणि हा जातीभेद करणाऱ्या महादेवी ट्रस्टविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंनिसने केली आहे. या निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, ऍड. समीर शिंदे, संजय हराळे, प्रा. डॉ. सुदर्शन घोडेराव, दिलीप काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रविवारी गावजेवण
कायद्याच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे माणसामाणसात भेदभाव करणाऱ्या या प्रथेच्या विरोधात अंनिसने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवदेन देऊन ही प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे. उद्या रविवारी (२३ एप्रिल) त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवण आयोजित केले आहे. आता या कुप्रथेविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर तरी रविवारच्या गावजेवणात सर्व गावकरी एकाच पंगतीत बसून जेवतात की जातीभेदाच्या या परंपरेकडे प्रशासनही दुर्लक्ष करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वरच्या महादेवी ट्रस्टने धार्मिक प्रथा-परंपरेच्या नावाखाली हा सामाजिक विषमतेला व जातीभेदाला खतपाणी घालणार अनिष्ट, अमानवीय आणि राज्यघटनेचे उल्लंघन करणारा प्रकार चालूच ठेवण्याचा अट्टाहास केला, आग्रह धरला तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.