नवी दिल्लीः रस्ते अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार मिळणार असून त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘कॅशलेस ट्रिटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार रस्ते अपघातातील जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार आहे.
दिल्लीतील भारत मंडपम येथे देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यासोबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बैठक घेतली. वाहतूक धोरणामध्ये सुधारणा करणे आणि रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय वाढवणे या उद्देशाने घेण्यात आलेल्या बैठकीत गडकरी यांनी या योजनेची घोषणा केली.
आम्ही कॅशलेस ट्रिटमेंट ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या जखमींच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे, असे गडकरी म्हणाले.
जखमींच्या उपचारावर सरकारकडून जास्तीत जास्त दीड लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी रस्ते अपघाताची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य आहे, असे गडकरी म्हणाले.
हिट अँड रन अपघातात जीव गमावणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांना सरकारकडून दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही गडकरी यांनी या बैठकीत दिली. रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून सुरक्षा उपायांचा भाग म्हणून अपघातांचे ब्लॅकस्पॉट शोधून काढून ते दुरूस्त करण्यात येतील, असे गडकरी म्हणाले.