व्यंगचित्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्याचा विकास, अभ्यासक्रमात समावेश कराः डॉ. संध्या मोरे यांच्या संशोधनातील शिफारस


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): व्यंगचित्रांतील संवाद आणि भाष्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यक असलेली चिकित्सक विचार पद्धती आणि विश्लेषणात्मक कौशल्याचा विकास होत असल्यामुळे अभ्यासक्रमांत व्यंगचित्रांचा समावेश केल्यास विद्यार्थी विषयाशी भक्कमपणे जोडले जातील, असा निष्कर्ष काढत व्यंगचित्रांचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्याची शिफारस डॉ. संध्या गुलाबराव मोरे यांनी पीएच.डी.साठी सादर केलेल्या शोधप्रबंधात केली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील विवेकानंद शिक्षण संस्था संचलित बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक संध्या गुलाबराव मोरे यांनी पीएच.डी.साठी ‘निवड व्यंगचित्रांचे सांस्कृतिक वाचनः एक अभ्यास’ (Cultural Reading of Select Cartoon-A Study) या विषयावरील शोधप्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाने हा शोधप्रबंध स्वीकारून त्यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर केली आहे.

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. विजयकुमार बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले आहे. डॉ. संध्या मोरे यांच्या या मौलिक संशोधनाबद्दल आणि विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे, अक्षय शिसोदे, तुषार शिसोदे, यशोद शिसोदे यांनी अभिनंदन केले आहे

डॉ. संध्या मोरे यांनी या संशोधनात निवडक व्यंगचित्रांचा (Cartoons)  सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टीकोनातून अभ्यास केला. व्यंगचित्रे केवळ विनोद निर्माण करण्यासाठी नसतात तर ते समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वास्तवांचे आरसे असतात. व्यंगचित्रांचे माध्यम समाजशास्त्रीय आणि साहित्यिक अभ्यासासाठी किती परिणामकारक ठरू शकते हे दाखवून दिले.

डॉ. मोरे यांनी व्यंगचित्रे समाजातील सांस्कृतिक मूल्ये, परंपरा व बदल यांचे चित्रण करतात. ते समाजात असलेले तणाव, विसंगती आणि वास्तव हलक्याफुलक्या पण प्रभावी पद्धतीने दाखवतात, ही व्यंगचित्रांची सांस्कृतिक उपयोगिता या संशोधनातून अधोरेखित केली आहे. डॉ. मोरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजरचना, भाषिक शैली, सांस्कृतिक मूल्ये आणि लोकमानस यांचा अभ्यास करून इंग्रजी विषयाच्या अभ्यासाला एक नवे परिमाण दिले आहे. या संशोधनातील ठळक निष्कर्ष असेः

सांस्कृतिक वास्तवाचे प्रतिबिंबः व्यंगचित्रे ही केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत. व्यंगचित्रे ही समाजातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वास्तवांचे प्रतिबिंब असतात. ते लोकांच्या भावना, सामाजिक समस्या आणि सत्ताधाऱ्यांवरची टीका हसत-खेळत व्यक्त करतात, हे निवडक व्यंगचित्रांचे वाचन केल्यावर स्पष्ट झाले आहे.

सांस्कृतिक आशयाची मांडणीः व्यंगचित्रांमध्ये भाषेची मितव्ययिता (brevity) असते, पण त्यातून गहन सांस्कृतिक व सामाजिक संदेश दिला जातो. धर्म, जातीभेद, लिंगभेद, शिक्षण, ग्रामीण-शहरी संघर्ष अशा अनेक सांस्कृतिक संदर्भांचे विश्लेषण  व्यंगचित्रे करतात.

भाषा व दृश्यांचा संगमः व्यंगचित्रांमध्ये दृश्यरूप (drawing) आणि भाषिक घटक (captions/dialogues) यांचा संगम असतो. त्यामुळे वाचकावर त्वरित परिणाम होतो. इंग्रजी विषयाच्या अभ्यासात हे विद्यार्थ्यांसाठी सोपे आणि परिणामकारक ठरते.

सामाजिक टिकेचे प्रभावी माध्यमः व्यंगचित्र हेसामाजिक टीकेचे प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्रे सामाजिक न्याय, भ्रष्टाचार, लोकशाही, शिक्षणातील विषमता यावर प्रभावी भाष्य करतात. त्यामुळे ते संशोधनासाठी मौल्यवान साधन ठरतात.

शैक्षणिक उपयोगिताः इंग्रजी विषय शिकवताना व्यंगचित्रांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना भाषा, व्याकरण आणि सर्जनशील लेखन समजणे सोपे होते. व्यंगचित्रांमधील संवाद आणि ओळी किंवा भाष्य विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार पद्धती आणि विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करतात. अभ्यासक्रमात व्यंगचित्रांचा समावेश केल्यास विद्यार्थी विषयाशी अधिक भक्कमपणे जोडले जातात.

सामाजिक बदलांचे चित्रणः व्यंगचित्रे समाजातील सांस्कृतिक मूल्ये, परंपरा व बदल यांचे चित्रण करतात.ते समाजात असलेले तणाव, विसंगती आणि वास्तव हलक्याफुलक्या पण प्रभावी पद्धतीने दाखवतात. सांस्कृतिक संशोधनासाठी व्यंगचित्र हे एक प्रकारचे दस्तऐवजीकरण ठरते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!