
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगरातील मुख्य पोस्ट ऑफिसचे गैरव्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे लाडक्या बहिणींची अक्षम्य हेळसांड होत असून गेल्या चार दिवसांपासून खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी शेकडो महिला मुख्य पोस्ट ऑफिसला हेलपाटे मारत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत पोस्टातील कर्मचारी या महिलांना पैसेच दिले जात नाहीत. विशेष म्हणजे आजही लाडकी बहीण योजनेचे खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी शेकडो महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी केली. परंतु तांत्रिक कारण पुढे करत या महिलांना पैसे देण्यात तर आले नाहीत. त्यामुळे या महिला संतप्त झाल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ११ सप्टेंबर रोजी राज्यभरातील महिलांच्या खात्यात जमा झाले. या योजनेतून दरमहिन्याला मिळणारे १ हजार ५०० रुपये गोरगरिब महिलांसाठी मोठा आधार ठरले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या शेकडो लाभार्थी महिलांची खाती पोस्टाच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत आहेत. आपल्या खात्यावर जमा झालेली ही रक्कम काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून शेकडो महिला लाभार्थी पोस्ट ऑफिसमध्ये हेलपाटे मारत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत या महिलांना पैसेच दिले जात नसल्याची तक्रार अनेक महिलांनी केली आहे.
आपल्या खात्यात जमा झालेली लाडकी बहीण योजनेची रक्कम काढण्यासाठी आजही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये शेकडो लाभार्थी महिलांनी गर्दी केली. परंतु पोस्ट ऑफिसच्या खिडकीवर केवळ एकच कर्मचारी बसलेला होता. या लाभार्थी महिलांना आजही सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अनेक तासांपासून महिला रांग लावून ताटकळत उभ्या आहेत. मुख्य पोस्ट ऑफिसच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते असलेल्या महिला शहराच्या वेगवेगळ्या भागातील रहिवाशी आहेत. रिक्षाचे पैसे खर्च करून गेल्या चार दिवसांपासून त्या पोस्टात येत आहेत. मात्र मुख्य पोस्ट ऑफिसचे गैरव्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा फटका त्यांना बसत आहे. दररोज रिक्षाने येणाऱ्या या महिलांना रिकाम्या हातानेच परत फिरावे लागत आहे. पहा व्हिडीओ-
कर्मचाऱ्यांची मुजोरी
लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढण्यासाठी शेकडो महिला दररोज मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये येत आहेत. परंतु त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागत आहे. पोस्टातील कर्मचारी या महिलांना कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाहीत. पोस्टातील कर्मचारी मुजोरी करत आहेत. पोस्ट ऑफिसमधील खिडकीवर फक्त एकच कर्मचारी बसलेला आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे दिले जात आहे. परंतु ही यंत्रणा कधी सुरू होईल आणि पैसे कधी दिले जातील, याबाबत कोणीही काहीही सांगायला तयार नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शिंदे यांनी सांगितले.
