यवतमाळः आंबेडकरी कवि प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ हा पहिला कवितासंग्रह नोशनप्रेस या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रसिद्ध विचारवंत, नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे.
कवि प्रा. संदेश ढोले यांच्या ‘एवढेच फक्त सांगता येते’ या कवितासंग्रहातील कवितांवर प्रसिद्ध समीक्षक जयंत साठे यांनी वैचारिक भाष्य केले आहे. तर पद्मश्री ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी कवितासंग्रहाचे ब्लर्ब लिहिले आहेत. हा कवितासंग्रह लवकरच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.
प्रा. संदेश ढोले यांच्या कवितेवर ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिहितात…
धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलेला सांस्कृतिक संघर्ष आंबेडकरी प्रतिभावंतांनी टोकदार केला.
मूल्याधिष्ठित, स्वतंत्र आणि समतामय समाज निर्मितीसाठी आंबेडकरी कवींनी पुकारलेला एल्गार अद्वितीय होता. विषम व्यवस्थेवर प्रश्नांचे खोलवर ओरखडे उमटविणारी आंबेडकरी कविता भेदक होती, मनुष्यत्वाच्या उत्कर्षासाठी आणि पर्यायी संस्कृतीसाठी आग्रही होती. कवी संदेश ढोले यांची कविता सुद्धा याला अपवाद नाही.
समकाळ अनंत विषाक्त समस्यांनी ग्रस्त आहे. अंधारयुगाचे पुरस्कर्ते हा अंधार अधिकाधिक गडद करण्यासाठी बौद्धिकं घेत आहेत. माणूस उद्ध्वस्त करणाऱ्या नवनवीन योजनांना ते जन्म देत आहेत. अशावेळी उजेडावर प्रेम करणारी माणसं हतबल असली तरी निराश मात्र नाहीत. या मनुष्यद्रोही काळाची संदेश ढोले गंभीर समीक्षा करतात. त्यांचे सहजसुंदर शब्द कविता होऊन आपल्याशी संवाद साधतात.
ढोले यांची कविता बुद्धनिष्ठ आहे. बुद्धांनी सांगितलेल्या वैश्विक मानवी मूल्यांचा ही कविता पुरस्कार करते आणि सम्यक जाणिवांना अधोरेखित करते. जगाच्या पुनर्रचनेचे सूत्र ढोले यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. साहित्याच्या रणांगणात संदेश ढोले यांची तेजस्वी कविता स्वतंत्र ओळख निर्माण करेल याची खात्री आहे. त्यांच्या कवितीक जगण्याला मी मन:पूर्वक सदिच्छा देतो.
–पद्मश्री लक्ष्मण माने, ‘उपरा’कार
प्रा. संदेश ढोले यांच्या कवितेवर नाटककार, विचारवंत प्रेमानंद गज्वी लिहितात…
कवी संदेश ढोले हे गेली अनेक वर्षापासून कवितालेखन करीत आहेत. विद्रोह, परिवर्तन हा त्यांच्या कवितांचा स्वभावधर्म आहे. त्यांच्या कविता अनेक प्रसिध्द दैनिकातून, मासिकांतून प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांच्या आजपर्यंत प्रसिध्द झालेल्या कविता ‘एवढेच फक्त सांगता येते’ या कवितासंग्रहात प्रकाशित झालेल्या आहेत. या अगोदर त्यांचे आखरीचं तुव्हच सडान चीबविन: वैचारिक अर्थमीमांसा व आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा असे दोन समीक्षेची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कवी संदेश ढोले यांचा साहित्य संमेलनाच्या, बुध्द महोत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग राहिला आहे. आजही कवी संदेश ढोले आंबेडकरवादी साहित्य, सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय आहेत. ‘एवढेच फक्त सांगता येते’ हे त्यांचे तिसरे पुस्तक मराठी वाचकांपुढे येत आहे. सुज्ञ, जाणकार, रसिक वाचकांकडून त्यांच्या या कविता संग्रहाचे नक्कीच स्वागत होईल अशी आशा आहे.
–प्रेमानंद गज्वी, प्रसिद्ध विचारवंत, नाटककार