छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना मज्जाव करणारा मस्तवाल उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून जातीयवादी फुत्कार सोडणाऱ्या कऱ्हाळेला तत्काळ निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या संघटनांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.
६ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्माचारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची तयारी करत असताना आरक्षणाचे लाभ लाटून उपकुलसचिवपदी बसलेल्या विष्णू कऱ्हाळेने त्यांना बोलावून घेऊन दमबाजी केली आणि अभिवादन करण्यास मज्जाव केला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठातच महापरिनिर्वाण दिनी हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आक्रमक झालेले विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी विष्णू कऱ्हाळेविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी विद्यापीठात धडकले. आंबेडकरी कार्यकर्ते येत असल्याचे पाहून विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार कुलुपबंद करून त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.
विष्णू कऱ्हाळे याच्या मस्तवालपणामुळे आंबेडकरी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. विष्णू कऱ्हाळे हे स्वतःला आदिवासी असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील तरतुदींनुसार मिळालेल्या आरक्षणाचे लाभ लाटूनच विद्यापीठात नोकरीला लागलेले आहेत. अशा व्यक्तीने जातीयवादी मानसिकतेतून कर्मचाऱ्यांना हेतुतः अभिवादन करण्यास मज्जाव केला आहे. मूळ आदिवासींच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तिरस्काराची भावना असूच शकत नाही. त्यामुळे कऱ्हाळेने सादर केलेल जातप्रमाणपत्रही बोगस असण्याची शक्यता असून त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी या संघटनांनी निवेदनात केली आहे.
मुळात विष्णू कऱ्हाळे यांची विद्यापीठातील नियुक्तीच नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल आणि फसवणूक करून कऱ्हाळे यांनी विद्यापीठात नोकरी मिळवलेली आहे. याबाबतच्या पुराव्यासह लेखी तक्रारी आपल्या कार्यालयाकडे आधीच करण्यात आल्या आहेत. त्यावर आपल्या कार्यालयाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच ६ डिसेंबर २०२३ रोजीचा हा प्रकार घडला आहे, अशी आमची धारणा आहे, असे या संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.
विष्णू मारोती कऱ्हाळे यांना तातडीने निलंबित करून ६ डिसेंबर २०२३ रोजी घडलेला प्रकार, कऱ्हाळेची मूळ नियुक्ती आणि जातप्रमाणपत्र या सर्वच बाबींची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले. या आंदोलनात विजय वाहुळ, राहुल साळवे, रमेश मगरे, लखन दांडगे, सुशांत खडसन, कपिल बनकर, गौतम बावस्कर, सचिन भुईगड,, रोहित दाभाडे, बाळू मगरे, रमेश वाघ इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विद्यार्थी संघटनांकडूनही निलंबनाची मागणी
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव करणारा उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेला तत्काळ निलंबित करण्याची मागणी विविध आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनीही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन केली आहे. विष्णू कऱ्हाळेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमानकारक उल्लेख करून अभिवादन करण्यास मज्जाव केल्यामुळे आंबेडकरी समुदायात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कऱ्हाळेला तत्काळ निलंबित करावे, त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन बहुजन सेनेचे राहुल वडमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, पँथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, एसएफआयचे लोकेश कांबळे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशिकांत कांबळे, ऍड. अतुल कांबळे, विकास रोडे, सम्यक सर्पे, जयेश पठाडे, प्रवीण वाघमारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.