चंदीगडः शाळांमधील विद्यार्थ्यांनी रोज सकाळी ‘गुड मॉर्निंग’ म्हणून अभिवादन करण्याचा प्रघात बंद करण्याचे निर्देश हरियाणा सरकारने जारी केले आहेत. १५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी एकमेकांना किंवा शिक्षकांना ‘गुड मॉर्निंग’ऐवजी ‘जय हिंद’ म्हणत अभिवादन करावे, असे या निर्देशात म्हटले आहे.
हरियाणा सरकारने यासंबंधी काढलेले परिपत्रक सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, ब्लॉक शिक्षणाधिकारी आणि सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे. येत्या १५ ऑगस्टपासून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हरियाणामध्ये ‘गुड मॉर्निंग’ म्हणून अभिवादन करण्याचा प्रघात बंद होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ऐक्याविषयी आणि जाज्वल्य इतिहासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जोपासली जाईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘जय हिंद’ या शब्दामधून प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमारेषा अस्पष्ट होऊन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकतेचा विचार जोपासला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच एकात्मतेची भावना निर्माण होईल, असे हरियाणा सरकारच्या या परिपत्रकात म्हटले आहे.
‘जय हिंद’मुळे विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे कौतुक करण्यासाठी प्रोत्साहित करेल. ‘जय हिंद’चा नियमित वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकरुपतेची भावना वृद्धींगत होईल. शिस्तबद्ध सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सशस्त्र दले, निमलष्करी दल आणि पोलिस दलात ‘जय हिंद’ची अभिवादन म्हणून अंमलबजावणी करण्यात येते, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
दैनंदिन दिनचर्येमध्ये पारंपरिक अभिवादनाचा समावेश केल्यामुळे सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय परंपरांचा आदर दुनावतो. ‘जय हिंद’ हे अभिवादन प्रेरणादायी आणि प्रेरक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याच्या त्यांच्या क्षमतेची आठवण करून देते. ‘जय हिंद’ हे भारतीय युवांसाठी प्रेरणेचे स्रोत आहे. ते युवांना भारताच्या विकासात सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करते, अशी भूमिकाही या परिपत्रकात मांडण्यात आली आहे.