मुंबईः राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे खरेदी करता यावे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती मिळावी या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशुंच्या विविध प्रजाती यांसह अनेक कृषी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मुंडेंकडून तयारीचा आढावा व पाहणी
परळी येथील शासकीय विश्रामगृहात कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी विभागाचे सह संचालक दिवेकर, मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषी, महसूल पोलीस अधिकारी उपस्थित होते.
परळी शहरातील बाजार समिती मैदानावर सुरु असलेल्या कृषी महोत्सवाच्या तयारीची मुंडे यांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले.