
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीमध्ये ८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनाची पूर्वतयारी सध्या सुरू असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र शासनाचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, ऑरिक सिटी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत.
हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजीत होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यात देशविदेशातील उद्योजक येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विशेष ओळख दर्शविणारे, येथील संस्कृती, कला यांचे दर्शन घडविणारे स्टॉल्स लावले जाणार आहेत. जेणेकरुन येणाऱ्या बाहेरच्या उद्योग प्रतिनिधींना त्याची ओळख होईल. त्याचप्रमाणे येथे उत्पादन, ऑटोमोबाईल, कृषी, टेक्सटाईल, फुड, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, पर्यटन, आतिथ्य उद्योग अशा विविध उद्योग क्षेत्रातील प्रदर्शने लावली जाणार आहेत.
प्रदर्शन आयोजनाच्या ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, इंटरनेट सुविधा, नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुविधा इत्यादीबाबत प्रशासनाच्या सहयोगाने उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित विभागांना निर्देशित केले.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मनपाचे अपर आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उद्योग सहसंचालक स्वप्निल राठोड, ऑरिक सिटीचे शैलेश धाबेकर, अरुण दुबे, कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल पाटील तसेच मसिआ व अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.