छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तांचा अतिरिक्त कार्यभार पुण्याच्या उपायुक्तांकडे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे रखडणार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा समाज कल्याण उपायुक्त डॉ. दीपक खरात यांची छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्तपदी बदली झाल्यामुळे येथील अतिरिक्त कार्यभार पुण्याच्या समितीचे सदस्य व समाज कल्याण उपायुक्त एस.आर. दाणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जेईई, नीट आणि सीईटीसह विविध परीक्षांना बसणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा उपायुक्त डॉ. दीपक खरात यांची छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्तपदी नुकतीच बदली झाली. त्यांनी या पदाचा कार्यभारही स्वीकारला. त्यांच्या ठिकाणी बदली करण्यात आलेल्या जयश्री सोनकवडे यांनी पदभार न स्वीकारल्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य तथा समाज कल्याण उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुण्याच्या समितीचे सदस्य तथा समाज कल्याण उपायुक्त दाणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सध्या जेईई, नीट, सीईटीसारख्या विविध परीक्षांना बसणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीची असंख्य प्रकरणे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेली आहेत. ही प्रकरणे वेळेत निकाली काढली गेली तरच या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश सुकर होणार आहेत. परंतु दाणे यांना पुण्याच्या जातपडताळणी समितीचे नियमित कामकाज सांभाळूनच छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) जातपडताळणी समितीच्या कामकाजाकडे वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे फारफार तर ते आठवड्यातून एखादा दिवसच छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) जातपडताळणी समितीसाठी वेळ देऊ शकणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव वेळेत मार्गी कसे लागणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समता पंधरवड्याचेही होणार वांधे

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान समता पंधरवडा राबवण्यात येत आहे. या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या आणि इयत्ता १२ वीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुसंवर्धन, दंतशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातपडताळणीसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे दाणे हे या विशेष मोहिमेसाठी एकाच वेळी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वेळ कसा देऊ शकणार आणि ही विशेष मोहीम यशस्वी कशी होणार? हाही प्रश्न आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांची जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुलभ व वेळेत पूर्ण होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातपडताळणी समितीवर याआधी काम केलेले छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विद्यमान प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त डॉ. दीपक खरात यांच्याकडेच या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास जातप्रमाणपत्र पडताळणीचे काम सुलभ आणि वेळेत पूर्ण होईल, अशी भावना मागासवर्गीय विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातपडताळणी समितीचे कार्यालय आणि प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांचे कार्यालय खोकडपुऱ्यातील डॉ. आंबेडकर भवनच्या एकाच इमारतीत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!