मुंबईः हिंडेनबर्ग अहवालामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आज शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.
गौतम अदानी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा अहवाल हिंडेनबर्गने प्रसिद्ध केल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. काँग्रेसने अदानींच्या या २० हजार कोटींबद्दल कॅम्पनेही चालवली होती.
अदानी प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला असतानाच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही. त्यातून सत्य बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ती योग्य आहे, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार अदानींचा पाठराखण करत असल्याचे टिकास्त्र सोडण्यात आले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अदानी आणि शरद पवार यांच्यात झालेली ही भेट सूचक आणि महत्वाची मानली जात आहे. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदानी हे त्यांच्या काळ्या रंगाच्या कारमधून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली.
या भेटीमध्ये उभयतांत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदानी हे एकमेकांना भेटले तेव्हा तेथे या दोघांव्यरिक्त कुणीही हजर नव्हते. त्यामुळे दोघांत झालेली चर्चा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. या भेटीवरून आता विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.