नवी दिल्लीः रविवार हा हिंदू समाजाशी नव्हे तर ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. जेव्हा येथे इंग्रज राज्य करत होते, तेव्हा ख्रिश्चन समाज सुटी साजरी करत होता. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मंगळवारी झारखंडमधील दुमका येथे आयोजित प्रचारसभेत मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. आता प्रधानमंत्री मोदींना रविवारवरही आक्षेप आहे, असे काँग्रेसने प्रधानमंत्री मोदींच्या या वक्तव्यावर म्हटले आहे. ‘रविवारची सुट्टी ख्रिश्चनांच्या प्रभावाखाली सुरू झाली. ती हिंदू संस्कृतीमध्ये नाही. संपूर्ण देश, अख्खे जग पुन्हा हसू लागले आहे… मोदीजी, जो बेरोजगार आहे, तो संडेलाही बेरोजगार असतो आणि मंडेलाही बेरोजगारच असतो; पेट्रोलचे भाव संडेलाही शंभर रुपयांच्या वर असतात आणि मंडेलाही. हेच तुमचे प्राधान्यक्रम आहेत का?, असा सवाल ’काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केला आहे.
तुमचे प्राधान्यक्रम मागील दहा वर्षांपासून चुकीचेच आहेत. आता तुम्ही जाता-जाता तुम्ही हे सिद्ध करू लागला आहात की, तुमच्या प्राधान्यक्रमांचा अंदाज तुम्हाला दहा वर्षांपासून आलाच नाही. त्यामुळेच देश आज या स्थितीत आहे. चला, आता तुम्हाला आराम करण्यासाठी वेळ मिलेल. थकले आहात. आराम करा. तुम्ही जेव्हा केव्हा तोंड उघडता, तेव्हा तुम्हाला आरामाची गरज आहे, याबाबत लोक आश्वस्त होतात, असेही खेडा यांनी म्हटले आहे.
झारखंडच्या दुमका येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसची ही प्रतिक्रिया आली आहे. ‘माझे एक सहकारी सांगत होते की, लव्ह जिहाद हा शब्द पहिल्यांदा झारखंडमधून आला. झारखंडवाल्यांनी हा शब्द दिला आहे. आमच्या देशात रविवारची सुट्टी असते. जेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ख्रिश्चन समाज सुट्टी साजरी करत होता. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली. रविवार हिंदूंशी संबंधित नाही, ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. २००-३०० वर्षांपासून हे सुरू आहे. आता यांनी एका जिल्ह्यात रविवारच्या सुट्टीवर कुलूप ठोकले, म्हणाले शुक्रवारी सुट्टी असेल. आता ख्रिश्चनांशीही झगडा. हे काय चाललेय?,’ असे मोदी म्हणाले. या वक्तव्यामुळे मोदी पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.