छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील एका प्राध्यापकावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण सरचिटणीस असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील ओबीसी प्राध्यापकाविरुद्ध ही कारवाई केली आहे. एखाद्या प्राध्यापकाने अशा पद्धतीने नोकरी गमावण्याची महाराष्ट्रातील कदाचित ही पहिलीच घटना असावी.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्या आणि सग्यासोयऱ्यांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षण आंदोलन पुकारले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने निजाम कालीन नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रियाही सुरू केलेली आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, परंतु त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नका, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी मांडली आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करणारी पोस्ट मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश घुमटकर यांनी फेसबुकवर शेअर केली होती. परंतु त्यांना ही फेसबुक पोस्ट चांगलीच महागात पडली असून गैरवर्तनाचा ठपका ठेवत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली आहे.
डॉ. सुरेश घुमटकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ११ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणाच्या विरोधात एक पोस्ट केली होती. प्रा. घुमटकर हे ओबीसी प्रवर्गातून येतात. ‘ओबीसी बांधवांना हीन वागणूक देऊन त्यांचेवर अन्याय करणारे कुत्रे आज ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत,’ अशी पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्यामुळे अर्जुन महेश धांडे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १४ सप्टेंबर २०२३ रोजी भादंविच्या कलम २९५-अ, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना १५ सप्टेंबर २०२३ रोजी अटकही करण्यात आली होती.
प्रा. घुमटकर यांना अटक झाल्यानंतर आणि ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ अटकेत राहिल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांना निलंबित केले होते. प्रा. घुमटकर यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, महाविद्यालयाच्या व संस्थेच्या लौकिकास काळीमा फासणे आणि गैरवर्तन केल्याबद्दल आपल्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई का करण्यात येऊ नये? असे या नोटिशीत म्हटले होते.
नोटीस बजावल्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची विभागीय चौकशी लावली. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. प्रा. घुमटकर यांच्या फेसबुक पोस्टमुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, ही बाब माहीत असतानाही जाणूनबुजून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच त्यांनी फेसबुक पोस्ट केल्याचा ठपका मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यावर ठेवला.
माझ्या फेसबुक पोस्टमध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही, असा खुलासा प्रा. घुमटकर यांनी केला परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मराठा समाजाचे लोक ओबीसीमधून सरकारकडे आरक्षण मागत आहेत व तीव्र आंदोलन करत आहेत, असा निष्कर्ष काढत मी जातीचा उल्लेख केलेला नाही, माझ्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे, हा प्रा. घुमटकर यांचा बचाव चौकशी अधिकाऱ्याने फेटाळून लावला आणि या चौकशीत गैरवर्तनाचा ठपका ठेवत प्रा. घुमटकर यांना नोकरीतून बडतर्फ केल्याचा आदेश १५ फेब्रुव्रारी २०२४ रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने जारी केला आणि त्याच दिवशी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.
अनेक प्राध्यापक सोशल मीडियावर सक्रीय
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयात कार्यरत असलेले अनेक प्राध्यापक सोशल मीडियावर सक्रीय आहेत. विशेषतः मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मंडळाच्या अनेक प्राध्यापकांनी आक्रमकपणे मराठा आरक्षणाची बाजू मांडली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या कडवट भाषेत नेत्यांवर टिकास्त्रही सोडले आहे.
त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने अथवा ते प्राध्यापक ज्या महाविद्यालयात कार्यरत आहेत, त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संस्था अथवा महाविद्यालयाच्या लौकिकास काळीमा फासला जात असल्याचे कारण देऊन या प्राध्यापकांना साधी कारणे दाखवा नोटीसही बजावल्याचे ऐकीवात नाही. परंतु प्रा. घुमटकर यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ही ‘सिलेक्टिव्ह’ कारवाई आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
प्राध्यापक घुमटकर सरांनी न्यायालयात जावे. जातीने मराठा आसणार्या बरेच प्राध्यापकांनी ओबीसी समाजाच्या विरोधात पोस्ट केल्या तेव्हा नाही का दोन समाजात तेढ निर्माण होत. मराठा प्राध्यापकांवर का कारवाई केली नाही. सच का झूठ जल्द फैसला होगा. जातीवादी सचचा जाहिर निषेध ..
आरक्षण मागणं हे लोकशाहीला धरुन आहे.
पण,अस वागण गुंडगिरी आहे.
दोन्ही बाजूच्या लोकांना आपली भूमिका मांडण्याचा संवेधानिक अधिकार आहे….जातीयवादी संस्थानिकांचा…जाहीर निषेध
आपण प्राध्यापक आहेत आपणांस हे कळायला पाहिजे की कोणत्याही सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट टाकताना त्या पोस्टचा चुकीचा अर्थ तर निघणार नाही ना आणि OBC प्रवर्गातून फक्त मराठा समाज आरक्षण मागत आहे व तुम्ही तुमच्या पोस्ट मधून सरळ OBC प्रवर्गातून आरक्षण मागणार्यांना कुत्रा असा उल्लेख केला आहे तुमच्या वर कार्यवाही होणे अनिवार्य आहे, तुम्हीच म्हणालात की मराठा समाजाच्या प्राध्याकानी देखील अश्या प्रकारच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत पण त्यांनी तुमच्या सारखे कोणत्याही समाजाला अपशब्दात बोलले नसावेत म्हणून कार्यवाहीचा प्रश्न आला नसावा, आपण प्राध्यापक आहात तुम्ही विद्यादान करा तुमच्या हातातुन भारत देशाची उज्जवल नवीन पिढी घडणार आहे व आपण अश्या जातीय तेढ निर्माण करण्याच्या भानगडीत पडू नयेत शिक्षण व शिक्षक हे आई वडिलांच्या नंतर संस्कार देण्यासाठी चे एक विद्यापीठ आहे, मी कोणत्याही कार्यवाहीचे समर्थन करत नाही,