छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमातून दलित साहित्याचा पेपरच वगळण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या गोंडस नावाखाली दलित साहित्याच्या निर्मितीच्या भूमीतूनच एम. ए. मराठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातून हे साहित्य हद्दपार करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला दलित साहित्याची मोठी पंरपरा आहे. छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) नागसेनवनाच्या भूमीतूनच दलित साहित्याच्या निर्मितीची बीजे रोवली गेली आणि मराठी साहित्यातील एक स्वतंत्र आणि सशक्त साहित्य प्रवाह म्हणून दलित साहित्याचा उगम झाला. या दलित साहित्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लेखक, कवि, समीक्षक, कादंबरीकार, नाटककारांची एक मोठी पिढी उदयाला आली. दलित साहित्यानेच महाराष्ट्रातील दलित समूहाला नवे आत्मभान दिले आणि लढ्यासाठी बळही दिले आहे. आता त्या प्रेरणा स्रोताचीच छाटणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. मराठीच्या प्रथम वर्षापासूनच गेल्या कित्येक दशकांपासून दलित साहित्याचा पेपर शिकवला जात होता. गाभाभूत अभ्यासक्रमाच्या अभ्यासपत्रिकेत या पेपरचा समावेश होता. परंतु मोदी सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या गोंडस नावाखाली विद्यापीठाच्या मराठी विभागात शिकवल्या जाणाऱ्या एम.ए. मराठीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातून दलित साहित्याचा पेपरच वगळून टाकण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या भूमीतून दलित साहित्याची पाळेमुळेच उखडून टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे की काय? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या मानव्यविद्या शाखेतील एम.ए. च्या विविध १६ विषयांतील चारही सत्राच्या अभ्यासक्रमांना १९ जुलै २०२३ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम १२(७) मधील तरतुदींनुसार आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून मंजुरी दिलेली आहे. तसे परिपत्रक शैक्षणिक विभागाच्या उपकुलसचिवांच्या स्वाक्षरी काढण्यात आले असून एम.ए.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमांना मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठातांच्या शिफारशींवरून कुलगुरूंनी स्वीकृती दिल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
विभागप्रमुख म्हणतातः पेपर वगळला नाही, शिफ्ट केला!
याबाबत मराठी विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य यांच्याशी न्यूजटाऊनने संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातून दलित साहित्याबरोबरच ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्यही वगळण्यात आले आहे. दलित साहित्याचा पेपर रद्द करण्यात आलेला नाही तर तो द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शिफ्ट करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अनिवार्य रचनेत हा पेपर बसला नसता म्हणून तो द्वितीय वर्षाला शिफ्ट करण्यात आला आहे, असे डॉ. वैद्य म्हणाले.
…मग संलग्नित महाविद्यालयांच्या अभ्यासक्रम रचनेत दलित साहित्य कसे?
नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विद्यापीठाच्या मराठी विभागातील एम.ए. मराठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दलित साहित्य शिकवणे बंद करण्यात आले असले तरी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील एम.ए. विद्यार्थ्यांसाठी मात्र दलित साहित्याचा पेपर कायम ठेवण्यात आला आहे. संलग्नित महाविद्यालयांतील एम.ए. मराठीच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या पहिल्याच अभ्यासपत्रिकेत ‘दलित साहित्य प्रवाह व निवडक कलाकृती’ हा पेपर समाविष्ट करण्यात आला आहे.
विद्यापीठातील मराठी विभाग आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यांसाठीचा एम.ए. मराठीचा अभ्यासक्रम या दोन्हींचीही रचना नवी शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या रचनेत हा पेपर बसला नसता म्हणून तो द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शिफ्ट करण्यात आला असल्याचे डॉ. दासू वैद्य आता सांगत असले तरी याच धोरणानुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांसाठी एम.ए. मराठीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची जी रचना करण्यात आली आहे, त्याच्या रचनेत हा पेपर कसा बसला? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.