ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली घोषणा


नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपप्रधानमंत्री आणि राम मंदिर रथयात्रेचे प्रणेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली. भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 प्रधानमंत्री मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मी लालकृष्ण आडवाणी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून त्यांना भारतरत्नबद्दल माहिती दिली. लालकृष्ण आडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. आडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरूवात करून उपपंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृह खाते, माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणून देखील काम केले आहे, असे मोदी म्हणाले.

 गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी हे सक्रीय राजकारणापासून अलिप्त आहेत. आयोध्येतील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करावी यासाठी त्यांनीच त्यांच्या उमेदीच्या काळात मोठी चळवळ उभी केली होती. त्यासाठी राम मंदिर रथयात्रा काढली होती. मात्र यंदा जानेवारीत झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे त्यांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते. त्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर आरएसएसचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी आडवाणी यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले होते. परंतु आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास गैरहजर राहिले होते.

लालकृष्ण आडवाणी यांचे १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेतही मोठे योगदान होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी सर्वाधिक काळ भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा २ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर आडवाणींकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १९८६ मध्ये ते पहिल्यांदा भाजपचे अध्यक्ष बनले. १९९० पर्यंत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळातही त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. अलटबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते १९९९ ते २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान होते.

आडवाणी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्ण भारतातील सिंध प्रांतात ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानात आहे. कराचीतील सेंट्र पॅट्रिक्स स्कूल या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. राजस्थानमध्ये आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केल्यानंतर १९५७ मध्ये आडवाणी राजस्थान सोडून दिल्लीत आले. दिल्लीत तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले. आरएसएसच्या ऑर्गनायझरमध्ये त्यांनी सहायक संपादक म्हणूनही काम केले.

२०१५ मध्ये आडवाणी यांना पद्मविभूषण हा देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता. त्याच वर्षी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रोटोकॉल मोडून स्वतः वाजपेयी यांच्या घरी जाऊन त्यांना हा सन्मान प्रदान केला होता.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!