छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी अवघ्या ४८ तासांतच प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्याकडून पदभार काढून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून डॉ. फुलारी यांनी ४८ तासांच्या आत डॉ. सरवदे यांची निवड रद्द करून विद्यापीठ प्रशासन कोण चालवतेय? याची चुणूकच दाखवून दिली आहे. कुलगुरूंच्या माध्यमातून विद्यापीठात वर्णव्यवस्था लादण्याचे प्रयत्न होत असून डॉ. फुलारींकडून चांगल्या कामाची अपेक्षाच नाही. त्यामुळे त्यांना कुलगुरूपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे यांनी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी २९ जानेवारी रोजी प्र-कुलगुरू आणि चार अधिष्ठातांच्या तात्पुरत्या नेमणुका केल्या होत्या. या नेमणुका करून ४८ तास उलटत नाहीत तोच डॉ. वाल्मिक सरवदे यांच्याकडून अपमानास्पद पद्धतीने प्र-कुलगुरूपदाचा पदभार काढून घेतला. त्यामुळे कुलगुरू फुलारी रूजू होऊन आठवडाही झाला नाही तोच नव्या वादाला तोंड फुटले असून त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका घेत अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे यांनी त्यांना कुलगुरूपदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. फुलारींना कुलगुरूपदावरून हटवले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही डॉ. कांबळे यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणारे हे विद्यापीठ महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा सामाजिक संघर्षाचे आयाम असणारे आहे. हा परिसर अन्याय-अत्याचाराविरोधात सातत्याने उभा आहे. या विद्यापीठातून असंख्या विद्यार्थी पुरोगामीपणाचे बाळकडू घेऊन देशभरात अतिशय समर्थपणे अन्यायाच्या विरोधात पाय रोवून उभे आहेच. हे या विद्यापीठाचे वेगळेपण आणि मोठेपण आहे, याची आठवण डॉ. संजय कांबळे यांनी कुलपती रमेस बैस यांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
विद्यापीठ प्रशासन कोण चालवतेय?
डॉ. विजय फुलारी यांनी ४८ तासांच्या आत डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदावरील निवड रद्द करून विद्यापीठ प्रशासन कोण चालवतेय? याची चुणूक दाखवली आहे. भाजप व संघाचा अजेंडा राबवण्याचे काम कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याकडून होत आहे. भाजप व संघाचा गुप्त अजेंडा म्हणजे कर्मठ हिंदुत्ववाद म्हणजेच वर्णव्यवस्था आणण्याचे प्रयत्न कुलगुरूंच्या माध्यमातून होत आहेत. हे कुलगुरू फुलारींनी दाखवून दिले असून त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केली आहे, असा आरोपही डॉ. कांबळे यांनी कुलपतींना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
फुलारींकडून चांगल्या कामाची अपेक्षाच नाही
पुरोगामी मराठवाड्यात भाजप आणि संघाची विचारसरणी हाणून पाडणअयासाठी आम्ही हा विषय विद्यार्थ्यांमध्ये व जनतेत घेऊन जाऊ. भाजप व संघाच्या दबावाखाली कुलगुरू काम करत असल्यामुळे हे कुलगुरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व परिसरातील लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत, हे निश्चित आहे. पक्षीय दबावाला बळी पडून कार्यरत राहणाऱ्या कुलगुरूंकडून चांगल्या कामाची अपेक्षाच नाही. त्यामुळे त्यांना कुलगुरूपदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे अन्यथा पक्षीय काम करणाऱ्या कुलगुरूंच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही डॉ. कांबळे यांनी दिला आहे.
डॉ. सरवदेंचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला?
डॉ. वाल्मिक सरवदे हे विद्यापीठात कार्यक्षम प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी अधिष्ठाता म्हणून अतिशय जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम केले आहे. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्र-कुलगुरूपदावर तात्पुरती नियुक्ती केली होती. आणि अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले. हा विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय चुकीचा पायंडा आहे. हा डॉ. सरवदे यांचा अवमान आहे. कुलगुरूंना कार्यक्षम डॉ. सरवदेंचा अवमान करण्याचा अधिकार नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेही या पत्रात डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.