
मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात ट्रक-टँकरचालकांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. या संपामुळे राज्यभरातील पेट्रोल-डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. राज्यातील बहुतांश पेट्रोलपंप बंद पडले आहेत. दुसरीकडे, डिझेलअभावी एसटीची सेवाही बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळित व्हावा यासाठी हस्तक्षेप करण्याचे आदेश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत.
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक, टँकर आणि बसचालकांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. नववर्षाची सुरूवातच या आंदोलनाने झाल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह देशातील महत्वाच्या शहरात ट्रक, टँकर आणि बसचालकांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचा प्रभाव सोमवारपासूनच जाणवू लागला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधनपुरवठा ठप्प झाला आहे.
विदर्भात हे आंदोलन चिघळल्यामुळे विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरातील डिझेलचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
केंद्र सरकारने नव्याने केलेल्या रस्ते अपघात सुरक्षा कायदा जाचक व अन्यायकारक असल्याचे सांगत या कायद्याच्या निषेधार्थ मनमाडनजीक पानेवाडी आणि नागापूर परिसरात असलेल्या तेल कंपन्यांच्या टँकरचालकांनी संपाचे अस्त्र उपसले आहे.
त्यामुळे सोमवारी तीनही तेल कंपन्यांतून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडला नाही. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील १२ जिल्ह्यांना होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे पेट्रोलपंप बंद पडल्याने इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे.
मनमाड नजीक असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कार्पोरेशन या तीन महत्वाच्या इंधन कंपन्यांच्या प्रकल्पातून दररोज हजारावर टँकरमधून ७५ लाख लिटर पेट्रोल-डिझेलचा राज्यभरात पुरवठा केला जातो. या प्रकल्पातून नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, नंदूरबार, बीड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांना इंधनपुरवठा केला जातो. परंतु सोमवारी या प्रकल्पातून इंधन घेऊन एकही टँकर बाहेर पडला नाही.
पोलिसांना हस्तक्षेप करण्याचे आदेश
ट्रकचालकांच्या संपामुळे राज्यात काही ठिकाणी विविध वस्तुंच्या पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा न झाल्यामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाचा पुरवठा सुरळित व्हावा, यासाठी हस्तक्षेप करून पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलावीत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्याच्या अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून हे आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. ट्रक, टँकर आणि बसचालकांच्या संपामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामाबद्दल या आदेशात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
लालपरीची सेवाही बंद होण्याची चिन्हे
महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लालपरी सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचे सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. एसटीच्या बहुसंख्य गाड्या या डिझेलवरच धावतात. एसटीच्या दररोज धावणाऱ्या सुमारे १४ हजार बसेससाठी सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागले. एसटी बसेला डिझेलचा पुरवठा न झाल्यास एसटीची बससेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना बसण्याची शक्यता आहे.
एसटीच्या २५० आगारात बसेसमध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे. या सर्व आगारात फक्त मंगळवारी पुरेल इतकाच डिझेल साठा आहे. हा संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील, अशी भीती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
मुंबईलाही फटका, निम्मे पेट्रोलपंप बंद
ट्रक, टँकरचालकांच्या या संपाचा फटका मुंबईतील इंधनपुरवठ्याला बसला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २१० पेट्रोलपंपांपैकी निम्मे पेट्रोलपंप बंद होण्यास सुरूवात झाली आहे. आज रात्रीपर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळित न झाल्यास सर्व पेट्रोलपंप ठप्प होणार असल्याची माहिती पेट्रोलपंप मालक असोसिएशनने दिली आहे.
काय आहे नव्या कायद्यात?
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या ‘हिट अँड रन’ रस्ते अपघात सुरक्षा कायदा दोषींना १० वर्षे तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदी जाचक असल्याचे ट्रक, टँकर आणि बसचालकांचे म्हणणे आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून ट्रक, टँकरचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला टँकरमालकांनीही पाठिंबा दिला आहे.
