छत्रपती संभाजीनगरात हँडग्लोव्ह्ज बनवण्याच्या कंपनीला भीषण आग, ६ कामगारांचा होरपळून मृत्यू


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाईन एंटरप्रायजेस या हँडग्लोव्ह्ज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागून ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ४ कामगारांना स्वतःचा जीव वाचवला. अग्नीशमन दलाच्या पथकाने चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश मिळवले. ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी-२१६ मध्ये असलेल्या सनशाईन एंटरप्रायजेस ही कंपनी हँडग्लोव्ह्जचे उत्पादन करते. या कंपनीत २० ते २५ कामगार कामावर असून एकावेळी १० कामगार काम करतात. रात्रपाळीवर असलेले १० कामगार मध्यरात्रीच्या सुमारास झोपी गेलेले असताना कंपनीत अचानक आग लागली.

आगीच्या ज्वाळा भडकल्यामुळे गरम वाफा लागू लागल्या आणि काही कामगारांना जाग आली. कंपनीत आग लागल्याचे दिसताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली. परंतु आगीच्या ज्वाळांनी कंपनीच्या मुख्य दरवाजालाही घेरलेले असल्यामुळे या कामगारांना आगीतून लवकर बाहेर पडता आले नाही. चार कामगार कंपनीचे पत्रे उचकटून एका झाडाच्या मदतीने बाहेर पडले. मात्र सहा कामगारांना बाहेर पडता आले नाही. परिणामी या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला रात्री सव्वादोन वाजेच्या दरम्यान देण्यात आली. त्यानंतर ते लगेच घटनास्थळी पोहोचले. आज पहाटे चार वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवांनी कुलिंग करून आतमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न करूनही सहा कामगारांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

या आगीत बचावलेला कामगार अली अकबर याने सांगितले की, काम बंद करून आम्ही झोपी गेलो होतो. मध्यरात्री आम्ही अंगावर पांघरूण घेऊन झोपी गेलो असता आम्हाला गरम वाफा जाणवू लागल्या. डोळे उघडून आजूबाजूला पहातो तर सगळीकडे आग पसरली होती. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूनेही आग लागल्यामुळे आगातून बाहेर पडणे कठीण होते. मुख्य प्रवेशद्वारालाच आगीने घेरल्यामुळे आम्ही पत्रे उचकटून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्ही चार जण बाहेर पडण्यात यशस्वी झालो, असे अकबर म्हणाला.

या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.  या आगीत मृत्युमुखी पडलेले बहुतांश कामगार हे बिहार राज्यातील होते, अशीही माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!