भाजपच्या विधानसभा संपर्क प्रमुखाला भाजप कार्यकर्त्यांकडूनच लोखंडी रॉडने बेदम मारहाण, पक्षांतर्गत वादातून राडा; पहा व्हिडीओ


मेहकरः  तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद भाजप कार्यकर्ते साजरा करत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये मात्र रविवारी भाजप तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटांत तुफान राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपच्या मेहकर विधानसभा संपर्क प्रमुखाला भाजप कार्यालयात घुसून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या तुफान राड्यात भाजपचे अन्य काही पदाधिकारीही जबर जखमी झाले.

या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर भाजपचे दोन्ही गट पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या. पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

 भाजपचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई हे मेहकर येथे त्यांच्या विधानसभा संपर्क प्रमुखांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार होते. त्यांची ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी हा राडा झाला. प्रल्हाद अण्णा लष्कर आणि शिव ठाकरे यांच्यासह २० ते २५ भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश गवई, अर्जुन वानखेडे आणि सारंग माळेकर यांच्यावर हल्ला चढवला.

 भाजपच्या या कार्यकर्त्यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्याच कार्यालयात होत असलेला हा राडा पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दीही जमली होती. तालुकाध्यक्ष निवडीवरून भाजपच्या दोन गटात निर्माण झालेल्या वादाचे रुपांतर या राड्यात झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, भाजपच्या कार्यालयात झालेल्या या तुफान राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षांतर्गत वादातून झालेल्या या वादामुळे भाजपवर टिकास्त्रही सोडले जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी ट्विटरवर या मारहाणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रमुखाला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मारहाण. पहा किती शिस्तप्रिय पक्ष आहे,’ अशा शब्दांत शिल्पा बोडखे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. पहा व्हिडीओ

मेहकर भाजपमध्ये तालुकाध्यक्ष निवडीवरून तुफान राडा झाला. भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपच्याच विधानसभा संपर्क प्रमुखाला लोखंडी रॉडने मारहाण केली.

६ पदाधिकारी भाजपतून ६ वर्षांसाठी निलंबित

दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठींनी या राड्याची गंभीर दखल घेतली असून सहा पदाधिकाऱ्यांना भाजपतून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये शिव ठाकरे, प्रल्हादअण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर यांचा समावेश आहे. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी या राड्यानंतर ही तडकाफडकी कारवाई केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!