‘साहेब तुमचा हिस्सा कुठे पाठवू?’ संभाजीनगरच्या ठेकेदाराकडून एक कोटीची लाच घेताना नगर एमआयडीसीचा अभियंता गजाआड


अहमदनगरः बदलून गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी आणि स्वतःसाठी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) कंत्राटदाराकडून तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम मिळताच ‘साहेब पाकीट मिळाले, तुमचा हिस्सा कुठे पाठवू?’ असा फोन या लाचखोर अधिकाऱ्याने पंचासमक्षच केला. एसीबीच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार अरूण गुलाबराव मापारी यांनी त्यांच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीमार्फत अहमदनगरच्या एमआयडीसी वसाहतीत एक हजार मिमी व्यासाच्या लोखंडी पाइपलाइनचे काम केले होते. त्या कामाच्या बिलापोटी १ कोटी ५७ हजार ८५ रुपये आणि इतर कामाचे असे २ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते.

हे बिल मिळवण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या स्वाक्षऱ्या मिळवून बिल मंजूर करून देतो, असे सांगत अहमदनगर एमआयडीसीमध्ये नियुक्तीला असलेला सहायक अभियंता वर्ग-२ अमित किशोर गायकवाड याने आपल्यासाठी आणि वाघ याच्यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

कंत्राटदार मापारी यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी,३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेंडी बायपासजवळ लाचेची रक्कम घेण्याचे ठरले होते. ठरल्यानुसार गायकवाड वाहनातून तेथे आला.

एसीबीच्या पथकाने कंत्राटदार मापारीकडे ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि इतर खेळण्यातील नोटा अशा स्वरुपात एक कोटी रुपये वाटावेत असे बंडल तयार करून दिले.

ठरल्याप्रमाणे अमित गायकवाडने शेंडी बायपासजवळ अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) रोडलगतच्या मोकळ्या पटांगणात इनोव्हा गाडीतून येऊन पंचासमक्षच लाचेची रक्कम स्वीकारली.

या प्रकरणी अहमदनगर एमआयडीसीमध्ये नियुक्तीला असलेला सहायक अभियंता वर्ग-२ अमित किशोर गायकवाड (वय-३२, रा. नागपूर, मूळ राहणार चिंचोली, ता. राहुरी) याला एसीबीने अटक केली आहे. याच ठिकाणी पूर्वी नियुक्तीला असलेला उपविभागीय अभियंता गणेश वाघ (रा. अहमदनगर) याच्याविरोधातही एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

साहेब पाकिट मिळाले, तुमचा हिस्सा कुठे पाठवू?

लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर अमित गायकवाडने तेथूनच आपल्या मोबाइलवरून गणेश वाघ याला फोन केला. लाचेच्या रकमेच्या वाटपावरून त्यांचे संभाषण सुरू झाले. पैसे मिळाले आहेत. तुमच्या हिस्स्याची रक्कम कुठे पाठवू?  असे गायकवाडने वाघला विचारले. त्यावर वाघ याने काय केले त्यांनी? अशी विचारणा केली. त्यावर गायकवाडने यांनी दिले तर ते एकच पाकिट, असे उत्तर दिले.

गायकवाडच्या या उत्तरावर ‘ राहू दे तुझ्याकडेच. बोलतो मी तुला. ते तुलाच एका ठिकाणी पोहोचवायचे आहेत. कोठे ते सांगतो मी तुला नंतर. सध्या ठेव तुझ्या सेफ कस्टडीत,’ असे गणेश वाघ याने अमित गायकवाडला सांगितले.

गायकवाड आणि वाघ यांच्यातील हे संभाषण पंचासमक्षच झाले. त्यामुळे या गुन्ह्यात गणेश वाघचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात गायकवाड आणि वाघ यांच्या सोबत आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!