मुंबई: गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
‘या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत’, असे शिंदे म्हणाले.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नेमके काय घडले?
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील समर्थ सृष्टी या पाच मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत होरपळून ७ जणांचा मृत्यू झाला तर २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले. जखमींवर कुपर रुग्णालय आणि एसबीटी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ही आग पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लागली. यावेळी इमारतीतील बहुतांश रहिवाशी साखर झोपेत असल्यामुळे आग तिसऱ्या मजल्यावर पोहेचेपर्यंत कोणलाही थांगपत्ता लागला नाही.
अखेर स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे काही रहिवाशांना जाग आली आणि त्यंनी इतरांना तातडीने सावध केले आणि मग इमारतीतील रहिवाशांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली.