छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेले आणि नंतर कोणतीही विहित प्रक्रिया पूर्ण न करताच नियमबाह्यपणे सेवासातत्य देऊन ‘सरकारचे जावई’ करून घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २८ हंगामी प्राध्यापक उच्च शिक्षण संचालकांच्या नव्याने रडारवर आले आहेत. या प्राध्यापकांची नियुक्ती, पात्रता आणि विहित प्रक्रियेचा तपशील उच्च शिक्षण संचालकांनी मागवला असून यामुळे या प्राध्यापकांना नियमबाह्यपणे सेवासातत्य देऊन विद्यापीठ प्रशासनाने कारनामा करून सरकारी तिजोरीला घातलेला गंडा चव्हाट्यावर येणार आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा साद्यंत वृत्तांत पुराव्यांसह प्रकाशित केला होता.
आधीच कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्त्या, नियमबाह्यपणे देण्यात आलेले सेवासातत्य आणि सरकारच्या डोळ्यात धुळफेक करून एचटीई-सेवार्थ प्रणालीत समावेश करण्यात आलेल्या या २८ तदर्थ प्राध्यापकांनी ‘कॅस’अंतर्गत निवड श्रेणी आणि स्थाननिश्चिती मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. त्यासाठीही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला हाताशी धरून जोरदार लॉबिंग केले.
उच्च शिक्षण संचालकांनी या २८ प्राध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देता येणार नाहीत, असे आदेश ३१ जुलै रोजीच्या पत्रान्वये देऊनही या २८ तदर्थ प्राध्यापकांना कॅसचे लाभ देण्यात आल्याचे वृत्त न्यूजटाऊनने प्रकाशित केल्यानंतर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी तडकाफडकी कॅसचे लाभ रद्द करण्याचे आदेश जारी केले आणि या नियमबाह्य तदर्थ प्राध्यापकांचे मनसुबे धुळीस मिळाले.
आता उच्च शिक्षण संचालकांनी २८ प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबतचा तपशील सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालकांमार्फत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांना २५ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून दिले आहेत.
राज्य सरकारने ३० प्राध्यापक पदांचे आर्थिक दायित्व स्वीकारल्यानंतर या पदांसाठी जाहिरात देऊन विहित प्रक्रियेचा अवलंब करून या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे का? या नियुक्त्या करताना बंदुनामावलीचे पालन करण्यात आले आहे का? अशा विविध मुद्यांवर वस्तुस्थितीदर्शक तपशील सादर करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालकांनी विभागीय सहसंचालकांमार्फत विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील हे २८ तदर्थ प्राध्यापक उच्च शिक्षण संचालकांच्या नव्याने रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. नागनाथ कोतापल्ले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू असताना ३० प्राध्यापकांची विद्यापीठ निधीतून मनमानी पद्धतीने नियुक्ती केली होती. काही जण तर अनिवार्य पात्रता धारण करत नसतानाही त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यापैकी ११ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या विद्यापीठ निधीतून ५ वर्षे कालावधीसाठी १४ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या वॉक इन मुलाखतीद्वारे, २ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या विद्यापीठ निधीतून १ वर्ष कालावधीसाठी तर एका सहायक प्राध्यापकाची नियुक्ती एकत्रित वेतनावर कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती.
राज्य सरकारने २८ जानेवारी २०१५ रोजी शासन आदेश जारी करून ३० सहायक प्राध्यापकपदाचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यात मंजुरी दिली. या शासन आदेशात विहित कार्यपद्धतीने निधी उपलब्ध करून घेऊन खर्च करण्यात यावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. विद्यापीठ निधीतून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या सहायक प्राध्यापकांनाच सेवासातत्य द्यावे, असे या शासन आदेशात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही.
ज्यावेळी राज्य सरकारने विद्यापीठातील या ३० प्राध्यापकपदांचे आर्थिक दायित्व स्वीकारले तेव्हा डॉ. बी.ए. चोपडे कुलगुरू होते. राज्य सरकारचा हा निर्णय प्राप्त होताच डॉ. कोत्तापल्ले यांनी नियमबाह्यपणे आणि मनमानी पद्धतीने नियुक्त केलेल्या प्राध्यापकांनीच सेवासातत्य मिळवून एचटीई-सेवार्थ प्रणालीत आपले नाव घुसडून घेऊन ‘सरकारी जावई’ होण्यासाठी जोरदार लॉबिंग केले होते. परंतु डॉ. चोपडे त्या लॉबिंगला बधले नाहीत.
राज्य सरकारने व्यक्तींचे नव्हे तर पदांचे आर्थिक दायित्व स्वीकारले असल्यामुळे नव्याने प्रक्रिया करून भरती करावी लागेल, सध्या कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनाच सेवासातत्य देता येणार नाही, अशी भूमिका डॉ. चोपडे यांनी घेतल्यामुळे तब्बल चार वर्षे हे प्रकरण प्रलंबित राहिले. त्यानंतर डॉ. प्रमोद येवले हे कुलगुरू म्हणून आले आणि त्यांच्या पुढकाराने या २८ प्राध्यापकांना नियमबाह्यपणे सेवासातत्य देऊन त्यांची नावे एचटीई-सेवार्थ प्रणालीत समाविष्ट करून घेण्यात आली. आता उच्च शिक्षण संचालकांच्या निर्देशामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाची नव्याने झाडाझडती होणार असून या झाडाझडतीत २८ तदर्थ प्राध्यापकांना बेकायदेशीरपणे सेवासातत्य देऊन ‘सरकारचे जावई’ करून घेण्याच्या कारनाम्याचा पर्दाफाश होणार आहे.
व्यक्तींचे नव्हे, पदांचे आर्थिक दायित्व!
कोण आहेत ते २८ प्राध्यापक?
- डॉ. पुरूषोत्तम देशमुख, अर्थशास्त्र.
- डॉ. कृतिका खंदारे, अर्थशास्त्र.
- डॉ. मदनलाल सूर्यवंशी, भूगोल.
- विनय विजय लोमटे, रसायनतंत्रशास्त्र.
- डॉ. खान फारूख अफाखान, व्यवस्थापनशास्त्र.
- श्वेता ए. राजळे, व्यवस्थापनशास्त्र.
- सोनाली क्षीरसागर, व्यवस्थापनशास्त्र.
- अनुसया चव्हाण, रसायनशास्त्र.
- आर. एच. कलानी, व्यवस्थापनशास्त्र.
- सुयोग अमृतराव, व्यवस्थापनशास्त्र.
- व्ही.एच. शिंदे, व्यवस्थापनशास्त्र
- के.पी. रोला, व्यवस्थापनशास्त्र.
- वरूणराज कलसे, व्यवस्थापनशास्त्र.
- सीम कवठेकर, संगणकशास्त्र
- श्रीमती एम.जी. धोपेश्वरकर, संगणकशास्त्र.
- मानसीराव लिमगावकर(बाहेती)- संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान.
- के.पी. हवाल, रसायनशास्त्र.
- आर.एम. तिगोटे, रयानशास्त्र.
- एम.पी.सरकटे, रसायनतंत्रशास्त्र.
- एस.एस.भुसारी, रसायनतंत्रशास्त्र.
- एस.व्ही. भालशंकर, व्यवस्थापनशास्त्र.
- वाय.ए. वायकर, व्यवस्थापनशास्ज्ञ.
- एस.के.लाड, व्यवस्थापनशास्त्र.
- एस.एस. यंवल, व्यवस्थापनशास्त्र.
- अनिल व्ही. घुले, नॅनो टेक्नॉलॉजी.
- पराग हसे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी.
- एस.एस. अंबेकर, ललितकला.