मुंबईः आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्याबाबत होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर या मुद्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून (सोमवार, २५ सप्टेंबर) सुनावणी सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी तीन वाजता होणाऱ्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या १४ आणि एकनाथ शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आजच्या पहिल्या दिवशी सुनावणीची रुपरेषा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनीच ‘माफक वेळेत’ निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वेळकाढूपणावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विलंबावरून ताशेरेही ओढले होते. पुढील सुनावणीच्या वेळी आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आजपासून सुनावणी हाती घेतली आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या ५४ आमदारांविरुद्ध दोन्ही गटांकडून अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. प्रत्येक याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तिवादासाठी एक-दोन दिवस आणि त्यानंतर अंतिम युक्तिवादासाठी काही दिवसांचा कालावधी गृहित धरल्यास निर्णयासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या सुनावणीवेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनाही बाजू मांडण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार असून त्यांच्या युक्तिवादासाठीही वेळ लागू शकतो.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या काळात विधानसभा अध्यक्षांना सुनावणीसाठी वेळ मिळणार नाही. याबाबी लक्षात घेऊन सुनावणीसाठीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंच्या आमदारांना आज सोमवारी दुपारी तीन वाजता सुनावणीसाठी पाचारण केले आहे. त्यावेळीच सुनावणीचा तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे आमदार आपल्या दोन-दोन वकिलांसह हजर राहणार असल्याचे सांगण्यात येते. आमदारांच्या अपात्रतेआधी शिवसेना पक्ष कुणाचा? याबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून जून २०२२ मध्ये अस्तित्वात असलेला पक्ष आणि पक्षप्रतोद हा मुद्दाच लावून धरला जाणार आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून विधिमंडळात बहुमत असलेलापक्षच शिवसेना असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देत बाजू लावून धरली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मदत होईल अशीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आतापर्यंतची कृती असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध देशाचेच लक्ष लागले आहे.