नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण महत्वपूर्ण ठरले ते यासाठी की त्यांनी यावेळी कोणतीही मोठी घोषणा न करता, कोणतेही आश्वासन न देताच जनतेला आशीर्वाद मागितला. प्रधानमंत्री मोदींनी हा आशीर्वाद २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच मागितला हे स्पष्ट आहे. आम्ही ज्याची कोनशीला बसवतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो, असे म्हणत ते ‘मी पुन्हा येईन’ यात कोणताही ‘किंतु परंतु’ नसल्याचा आत्मविश्वासही ते वारंवार बोलून दाखवत होते.
विरोधी पक्षाला निशाण्यावर घेणे हे प्रधानमंत्री मोदींच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्ये राहिले. विरोधी पक्षावर त्यांनी आपल्या भाषणातील जेवढा वेळ खर्च केला, तो पाहता काही काळासाठी लाल किल्ल्याच्या तटबंदीला त्यांनी निवडणुकीचाच मंच बनवून टाकले. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसचे नाव घेतले नाही खरे, परंतु या भाषणात काँग्रेसच मुख्यतः त्यांच्या निशाण्यावर राहिली.
अल्पसंख्यांकांवर भाष्य, पण बहुसंख्यांकांवर मौन
प्रधानमंत्री मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगूलचालनावर हल्लाबोल करताना काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षावर टिकास्त्र सोडले. भाजपही घराणेशाहीला अपवाद नसली तरी मोदींच्या निशाण्यावर काँग्रेसमधील गांधी कुटुंबाची घराणेशाही निशाण्यावर राहिली. भ्रष्टाचारावर बोलतानाही त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षावर टिकास्त्र सोडले. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनही मोदींच्या टिकेचे लक्ष्य होते, परंतु यावेळी त्यांनी यामुळे सामाजिक न्यायाची लढाई कमकुवत झाल्याचा नवा मुद्दा जोडला. मात्र प्रधानमंत्री मोदींनी बहुसंख्यांकांच्या लांगूलचालनावर मौन बाळगले!
मी पुन्हा येईन, तुमच्यासाठीच जिंकेन!
२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल, असे आश्वासन दिलेहोते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवले. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय माझे कुटुंब आहेत. मी तुमचे दुःख सहन करू शकत नाही, असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
महागाईवरही ‘जुमले’, अन्य देशांशी तुलना
प्रधानमंत्री मोदी मोठ्या धारिष्ट्याने पंधरा ऑगस्टला महागाईवर बोलले. परंतु संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी महागाईचा मुद्दा उचलून धरला होता. नंतर आझादपूर भाजी मंडईत भाजीपाला विकणाऱ्या रामेश्वरचा व्हिडीओ काल राहुल गांधींसोबत व्हायरल झाला. त्या रामेश्वरला महागडा भाजीपाला खरेदी करू न शकल्यामुळे रडू कोसळले होते. तर प्रधानमंत्री मोदींनी महागाईचे नाव घेतले खरे, परंतु तिची तुलना जगातील अन्य देशात पसरलेल्या महागाईशी करून टाकली. सर्व जगात महागाई आहे. मी भारतातील महागाई कमी करण्यासाठी काम करत आहे, असे मोदी म्हणाले. महागाई वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आणि नफेखोरांवर सरकार कठोर कारवाई करेल, असे ते म्हणू शकले असते, परंतु आपल्या भाषणात त्यांनी ना कोणता इशारा दिला, ना महागाई कमी करण्यासाठी एखाद्या योजनेचा उल्लेख केला!
युवांचा उल्लेख, पण बेरोजगारीचा अनुल्लेख
प्रधानमंत्री मोदींच्या दीड तासाच्या भाषणात काहीही नाविण्य नव्हते. भाषण देताना ते घाईत वाटत होतो किंवा त्यांना कमी वेळात जास्त बोलायचे तरी होते. मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन तास १३ मिनिटांचे भाषण दिले होते. स्वातंत्र्यदिनी दिलेल्या भाषणात त्यापेक्षा वेगळी कोणतीही नवीन गोष्ट नव्हती. प्रधानमंत्री मोदींनी दोन कोटी ‘लखपती बहना’ करण्याचे जाहीर केले परंतु त्यासाठी कोणत्याही ठोस योजनेची घोषणा केली नाही. त्यांनी आपल्या भाषणात युवकांचा उल्लेख केला, परंतु त्यांच्यासमोर असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही उपायांवर चकार शब्दही बोलले नाही.
शेतकऱ्यांवर जरा जास्तच नाराजी
प्रधानमंत्री मोदींनी स्वातंत्र्यदिनी दिलेल्या भाषणात शेती आणि शेतकऱ्यांविषयीची चिंता गायब होती. त्यामुळे मोदी शेतकऱ्यांवर जरा जास्तच नाराज आहेत की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे. कृषी प्रधान देशात शेती आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य लक्षण मानले जात नाही. पण मोदींच्या भाषणात शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या चिंतेचा उल्लेख आला नाही.
शहरी लोक, मध्यवर्गीय हेच मतदार!
प्रधानमंत्री मोदींनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून दिलेले १० वे भाषण होते. यापूर्वी केलेल्या ९ भाषणात मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु यावेळी अशा घोषणा बेपत्ता झाल्या. केवळ शेतकऱ्यांचा संदर्भ आल्याने त्यातून काहीच फलनिष्पत्ती होत नाही. त्यामुळे शहरी लोक आणि मध्यमवर्गीय नागरिक हेच आपले मतदार आहेत, अशी खूणगाठ भाजपने मनाशी बांधून टाकली आहे, असेच मोदींच्या या भाषणावरून वाटू लागले आहे.
देहबोलीतून आत्मविश्वास गायब!
प्रधानमंत्री मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात देशवासियोंच्या ऐवजी मेरे परिवारजनोंने केली. दहा वर्षे स्थिर सरकारचे फायदे सांगितले. म्हणजेच २०२४ मध्ये मते आम्हालाच द्या, असा त्याचा अर्थ. मोदींनी आपल्या भाषणात तिसऱ्यांचा सरकार स्थापनेचा विश्वास बोलून दाखवला खरा परंतु तो आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून दिसला नाही. त्यांनी आपल्या भाषणात हजारो वर्षांच्या गुलामीचा उल्लेख केला, परंतु गुलामीपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या योगदानावर त्यांनी मौन बाळगले.
मणिपूरचाही उल्लेख
प्रधानमंत्री मोदींच्या भाषणात मणिपूरचाही उल्लेख आला. ईशान्येत विशेषतः मणिपूरमध्ये आणि देशाच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यत आला. देश मणिपूरच्या पाठीशी आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू, असे मोदी म्हणाले. परंतु मणिपूरला भेट देण्यावर त्यांनी भाष्य टाळले.