नवी दिल्ली/मुंबईः सध्या देशभर मान्सून सक्रीय असून देशाच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना पुढच्या काही दिवसांसाठी हवामानशास्त्र विभागने अलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवस बहुतांश जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या देशात मान्सून सक्रीय असून त्याची आगेकूच सुरूच आहे. कोकण, गोवा, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांवर पावसाचे दाट ढग आहेत. मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा राज्याचा मध्य भागाकडून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात १२० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरावरून आर्द्रतायुक्त वारे वाहत असल्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात पाच दिवसांत पाऊस अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण गुजरात, कोकण आणि गोव्यात २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, असे नरेश कुमार म्हणाले.
महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांना अलर्ट
हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तेथे पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी लागणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सून आपला कोटा पूर्ण करत असून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरात पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवसांसाठी अंदाज असा
नंदूरबार. जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात आज आणि १ ते ३ जूनदरम्यान मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात आज अतिमुसळधार तर १ ते ३ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, धुळे या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे चार दिवस म्हणजेच ३ जूनपर्यंत हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
राज्यात कुठे झाला किती पाऊस?
शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी झालेला पाऊस असा- विक्रमगड-१३४ मीमी, जव्हार-८३ मीमी, पालघर-८४ मीमी, उल्हासनगर-६२ मीमी, शहापूर-८५ मीमी, मुरबाड-९८ मीमी, भिवंडी-१११ मीमी, कनकवली- ८५ मीमी, सावंतवाडी-७५ मीमी, वैभववाडी-८० मीमी, चिपळूण-१०९ मीमी, दापोली-१२१ मीमी, मंडणगड-९० मीमी.
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-१६८ मीमी, धाडगाव अक्रानी-१०८ मीमी, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा-९५ मीमी, राधानगरी-३६ मीमी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी- १०७ मीमी, पेठ- ४० मीमी, त्र्यंबेकश्वर-४७ मीमी, पुणे जिल्ह्यातील लवासा-८९ मीमी, माळीण-४५.५ मीमी, लोणावळा ७९ मीमी, निमगिरी ५७.५ मीमी.