सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर राज्य सरकारकडून ‘पाणी’, पावसाचे कारण देत निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या!


मुंबईः राज्यातील पाऊस ३० जूननंतर जास्त वाढण्याची शक्यता असल्यामुळे सहकारी संस्थांच्या जाहीर झालेल्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात बाधा येऊ शकते आणि मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात, अशी कारणे पुढे करत सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी तेल लावून मैदानात उतरलेल्या इच्छुकांच्या आशेवर राज्य सरकारने ‘पाणी’ फेरल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

राज्यातील ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पूर्णतः पावसाळ्यातच होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा येऊ शकते. सहकारी संस्थांमधील बहुतांश शेतकरी सभासद खरीप हंगामातील शेतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहू शकतात, असे कारण देत राज्य सरकारच्या सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

 राज्यात निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची एकूण संख्या ८२ हजार ६३१ आहे. (२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून). त्यापैकी ४८ हजार ६६७ सहकारी संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी ४२ हजार १५७ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर ६ हजार ५१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र पावसाचे कारण देत राज्याच्या सहकार विभागाने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!