छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावी पूर्ववैमनस्यातून अक्षय भालेराव या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हे दुष्कृत्य केवळ निषेधार्ह नसून मानवतेला काळीमा फासणारे आहे. संभाजी ब्रिगेड या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. या प्रकरणाला जातीयवादी स्वरुप देऊ नये, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडने बोंढार गावात बौद्ध तरूण अक्षय भालेराव याच्या निर्घृण खूनप्रकरणी प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अलीकडे दुर्दैवाने काही गटातील किंवा वैयक्तिक पातळीवर निर्माण झालेले वाद सलोख्याने मिटत नाहीत. ते सुप्त अवस्थेत वाढत जातात. तर त्याला पेटवणारे काही समाजद्रोही व्यक्तीसुध्दा असतात आणि एका क्षणी त्याचे रूपांतर अशा गंभीर दुर्घटनेत होते, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
सध्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही जातीय, जमातीय, भाषिक, प्रांतिक, धार्मिक, आध्यात्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण गढूळ करणारा मोठा समूह कार्यरत आहे. परिणामी त्यांना समाजात दुफळी निर्माण करणे शक्य झाले आहे. राजकारणाच्या नावाखाली कधीकधी विद्वेषपूर्ण भाषा वापरली जाते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी अशा समाजद्रोही संस्था वा विचारांपासून सावध व दूर रहावे असे आवाहन केलेले आहे, असे प्रा. डॉ. भानुसे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने गावोगावी संवाद, संपर्क, समन्वय समिती स्थापन करून संपूर्ण सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी ही विनंती केली जाते. असे असतानाही अक्षय भालेराव हत्या प्रकरण घडते हे सर्वांसाठी चिंतनीय आहे. या पार्श्वभूमीवर आमची आपणास विनंती आहे की कृपया कोणीही या प्रकरणाला जातीयवादी स्वरुप देऊ नये, असे आवाहन प्रा. डॉ. भानुसे यांनी केले आहे.
हेही वाचाः आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?
बोंढार गाव व परिसरात सामंजस्याचे व सौहार्दाचे वातावरण राहील याची काळजी घ्यावी. बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून जनसामान्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी काम करावे, असे आवाहनही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील बौद्ध तरूण अक्षय भालेराव याची गावातील सवर्ण गावगुंडांनी १ जून रोजी पोटात चाकूचे सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अक्षय भालेरावने पुढाकार घेऊन गावात भीम जयंती साजरी केल्याचा राग मनात धरूनच या गावगुंडांनी अक्षयवर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सामूहिक हत्येच्या कटाचा गुन्हा दाखल करून अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केली आहे.